आम्हाला नगरसेवक व्हायचंय!

मलकापूर पालिकेसाठी भाजपच्या मुलाखतींना उदंड प्रतिसाद  महिला, उच्चशिक्षितांचाही सहभाग

कराड – मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टीने मलकापूर नगरपालिकेसाठी नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. नगराध्यक्षपदासह 20 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या मुलाखतीसाठी 119 जणांनी उपस्थिती लावली. यामध्ये महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वच इच्छुकांनी आत्तापासूनच आपापल्या पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून भाजपाच्यावतीने खंडोबानगर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपाचे प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, मोहनराव जाधव, आर. के. भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.

यावेळी विविध प्रभागातील उपस्थित इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांची माहिती, समस्या, समाजकारण व राजकारणाचा वारसा याबाबत सविस्तर विवेचन करत नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. काही इच्छुकांनी तर थेट मलकापूरातील सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवत त्यांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. मलकापूर नगरपालिकेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असून नगराध्यक्षपदासाठी 12 इच्छुक महिलांनी मुलाखती दिल्या.

यामध्ये मानसी शशिकांत राजे, डॉ. सारिका प्रशांत गावडे, दिपाली आबासाहेब गावडे, सुवर्णा रवींद्र येडगे, माजी जि. प. सदस्या भारती अनिल कडव, दिपा राहूल भोसले, अश्विनी संतोष हिंगसे, विद्याराणी हणमंतराव कराळे, रजनी सुभाष माने, गौरी सुनील कोळी, प्रियांका भारत जंत्रे, रुक्‍मिणी बाळासो जंत्रे यांचा समावेश होता.

यावेळी ना. डॉ. अतुल भोसले यांनी मुलाखतींना इच्छुकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मलकापूरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून भाजपच्या नेतृत्वामुळे भविष्यात शहराला निधीची कमतरता भासणार नसल्याचे प्रतिपादन मदनराव मोहिते यांनी केले. अशोकराव थोरात यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मोहिते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)