बीड – बीडचा आमदार व्हायचं असेल तर वर्षावरील गणपतीचा नव्हे, तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा, असा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे “वर्षा’ बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतले होते.

बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. क्षीरसागर यांचे नाव न घेता धनंजय मुंडे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला. पण बीडचा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी तरी त्यापेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्वाचा आहे, असे मुंडे म्हणाले.

विशेष म्हणजे राजुरी हे जयदत्त क्षीरसागर यांचे मूळ गाव आहे. राजुरीचा गणपती हा महाराष्ट्रासह देशातही प्रसिद्ध आहे. राजुरी इथे गणपतीचे जागृत मंदिर असून त्याच्यावर भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्त्व देखील आहे.
तसेच शरद पवार 1 ऑक्‍टोबरला बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे 31 सप्टेंबरला शरद पवार हे संदीप क्षीरसागर यांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांची जाहीर भेट घेणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय? या संदर्भात शरद पवारांचे मत काय? याविषयी मात्र आता उत्सुकता निर्माण झाली आहे

दरम्यान, बीड विधानसभा मतदार संघातली लढत संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर अशीच होण्याची दाट शक्‍यता आहे. चुलत्या-पुतण्यांच्या या लढाईमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)