आमदार साहेब! जरा लोकांच्या सन्मानाचे पण बघा

अधिकाऱ्यांनी झुल उतरायला पाहिजे; लोकप्रतिनिधींनी मनं मोठे करायला हवे

प्रशांत जाधव
लोकशाहीत कोणत्याही लोकप्रतिनिधीला मान, सन्मान मिळायलाच हवा. कारण ते लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतात. पण त्यासोबत ज्या लोकांनी तुम्हाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यांच्या सन्मानाची सुध्दा काळजी घेतली जावी. मात्र नेमके या उलट चित्र असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्वत:च्या मान,सन्मानासाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासोबतच लोकांच्या सन्मानाची काळजी घ्यावी अशी चर्चा होत आहे.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी कसे वागावे याचे वेगवेगळे धडे जिल्हा नियोजन भावनाच्या सभागृहात शिकवले गेले. राजशिष्टाचारानुसार सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या. शासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर राजशिष्टाचाराप्रमाणे लोकप्रतिनधींची नावे टाका. निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडील राजशिष्टाचार विभागाकडून तपासून घ्या, अशा सूचना विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

खरे तर विधासभेच्या आमदारांच्या तुलनेत विधान परिषदेच्या आमदारांना कमी सन्मान मिळतो. अशा अनेक तक्रारी असल्याने विधान परिषद विशेषाधिकार समिती राज्यभर दौरे करीत आहे. त्याचाच भाग म्हणून समिती गुरूवारी साताऱ्यात आली होती. यावेळी खऱ्या अर्थाने विधान परिषदेच्या आमदारांनी आपली कैफीयत मांडणे आवश्‍यक होते. पण हे आमदार कैफीयत सोडा समितीकडे साधे फिरकले सुध्दा नाहीत. आपल्याच हक्कासाठी काम करणाऱ्या समितीचा सन्मान आमदार महोदय करू शकत नाहीत. तर इतरांकडून सन्मानाची अपेक्षा कशी काय ठेवु शकतात. हा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न. समितीच्या अध्यक्षांनी आमदारांच्या तक्रारी वाढल्याने भविष्यात कोणाविरोधात हक्क भंगाचा खटला चालवण्याची वेळ येऊ नये. म्हणून जिल्हयात आल्याचे माध्यमांना सांगितले. जर साताऱ्यातून खरचं विधान परिषदेच्या आमदारांच्या तक्रारी होत्या तर ते गुरूवारी गैरहजर का? जर तक्रारी साताऱ्यातून नसतील तर समितीने सातारा निवडावा का? मग कोणाच्या हट्टापायी तर समिती साताऱ्यात आली नसेल ना? या चर्चांना सध्या जिल्हाभर उत आला आहे.

आमदार असो किवा खासदार त्यांचा लोकशाहीत सन्मान व्हायलाच हवा. पण स्वत:च्या मान, सन्मानाची काळजी असणाऱ्या कोणत्या लोप्रतिनिधीला सामान्य नागरिकांच्या मान, सन्मानाची काळजी आहे. स्वत:ला वाघ,सिंह म्हणवुन घेणाऱ्या आमदार महोदयांचे अधिकारी ऐकत तरी का नसतील? खरच अधिकाऱ्यांना पदाचा गर्व झाला आहे का? लोकप्रतिनिधी सांगत आहेत,पण अधिकारी ऐकत नाहीत. याचा अर्थ काय? लोकप्रतिनिधी काम चुकीचे सांगतात की सांगायची पध्दत चुकीची ? अधिकारी एखाद्या लोकप्रतिनिधीचे ऐकत नाहीत. याचा अर्थ त्यांना जनतेशी बांधीलकी नाही, असाच घ्यावा लागेल. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अधिकाऱ्याला सांगितला अन,त्याकडे कानाडोळा केला. असल्या तक्रारी करायच्या सोडून मला सॅल्यूट मारला नाही.मला अधिकारी मान,सन्मान देत नाहीत. या तक्रारी करणे म्हणजे यशवंत विचारांच्यापासून कोसो मैल दुर गेल्यासारखेच आहे. अशी चर्चा सद्या जिल्ह्यात सुरू आहेत.

वर नमुद केल्याप्रमाणे आमदारांचा मान, सन्मान व्हायलाच हवा. त्याबद्दल कुणाचे दुमत असायचे काही कारण नाही. पण सध्या आमदारांच्या सन्मानापेक्षा बाकी बरेच प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे सन्मान मिळाला नाही. म्हणून आगपाखड करण्यात ताकद खर्ची करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला, तर जनता नक्कीच तुमचा सन्मान करेल. यात शंका नाही.

… त्यांचा काळ आठवा !

सातारा जिल्ह्यात एक काळ होता. ज्या काळात आमदार आलेत असे कळाले तरी अधिकाऱ्यांची त्रेधापीट उडत होती. यशवंतराव चव्हाण,बाळासाहेब देसाई, शंकराव जगताप, प्रतापराव भोसले, विलास काका, चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले यांच्या काळात कधी सन्मानासाठी आमदारांना हात पसरावे लागले नाहीत. यातील अनेकांनी राज्याचे नेतृत्व केले होते. वरील पैकी सर्वांचा प्रशासनावर आदरयुक्त दबदबा होता. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात आता सगळे प्रश्न संपलेत अन फक्त सन्मानाचा प्रश्न बाकी राहिला आहे. असे वर्तन सुरू असल्याचे बोलले जाते.

पोलिसांच्या सॅल्यूटचा मान राखलायला हवा !

पोलिस दल हे शिस्तीचे खाते आहे. कनिष्ठाने वरीष्ठाला सॅल्यूट करावा असा शिरस्ता या खात्यात आहे. पण त्याचवेळी कनिष्ठाच्या सॅल्यूटचा मान वरिष्ठांनी राखायलाच हवा. त्याप्रमाणेच पोलिस हे समाजातील अशा लोकांना सॅल्यूट करू शकतात ज्यांच्याकडून त्याचा मान राखला जाईल. मात्र सध्या बहुतेक लोकप्रतिनिधींच्याकडून तसे होताना दिसत नाही. असे मत एका जेष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

पाटील, कुंभार, पतकींचा सन्मान का झाला?
तत्कालीन शिक्षक आमदार सुरेश पाटील,कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार रत्नाप्पा कुंभार,सांगलीचे माजी आमदार व्यंकाप्पा पतकी हे मतदार संघातील प्रत्येक नागरिकाचा सन्माम करत होते. प्रत्येकाच्या सुख दुख:त पत्र पाठवुन सहभागी व्हायचे. लोकांना त्यांच्या या कामाचे कौतुक असायचे. त्यामुळेच यांच्या वाट्याला सन्मान आला. तो त्यांना कधीच मागावा लागला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)