आमदार पुत्राची औरंगाबाद खंडपीठात धाव

जिल्हा नियोजन समिती निवडणूक प्रक्रिया : डोळस यांचा अर्ज ठरला वैध

नगर – श्रीरामपूरच्या नगरसेविका चंद्रकला डोळस यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा नियोजन समिती निवडणूक प्रक्रियेत अवैध ठरविल्यानंतर त्यांनी त्यावर हरकत घेतली. या हरकतीवर जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी गुरुवारी (दि. 10) निर्णय देत उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या निर्णयाविरोधात आमदार पुत्र संतोष कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीतील नगरपरिषदेच्या अनुसूचित जातीच्या एक जागेसाठी चार अर्ज आले होते. यातील तीन अर्ज छाननीत अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी अवैध ठरवत बाद केले. त्यामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे पुत्र संतोष कांबळे बिनविरोध निवडून येण्याची शक्‍यता निर्माण झाली. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर श्रीरामपूरच्या नगरसेविका चंद्रकला भाऊसाहेब डोळस यांनी हरकत दाखल केली. यावरील सुनावणी गुरुवारी झाली. यात जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी डोळस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे संतोष कांबळे यांच्या बिनविरोध निवडीची शक्‍यता मावळली. त्यामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी पुत्रासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. डोळस या माजी आमदार जयंत ससाणे यांच्या गटातील नगरसेवक आहेत. त्यामुळे कांबळे-ससाणे अशी प्रतिष्ठेची चुरस जिल्हा नियोजन समिती निवडणुकीमुळे रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)