आमदार नितेश राणे यांचा स्वपक्षालाच घरचा आहेर

मुंबई : ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेसने केलेला विरोध पाहून आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पत्रकार परिषद उधळून लावणे ही काँग्रेसची संस्कृती असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद उधळून दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार चित्रपटाला विरोध केला, ही काँग्रेसची संस्कृती आहे का?’ असा परखड सवाल विचारत काँग्रेसला टोला लगावला आहे. जेव्हा नारायण राणे विरोध करतात, तेव्हा टीका केली जाते, मग आता काँग्रेसच्या नेतृत्त्वाने दखल घेतली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसने पुणे, नागपुरात इंदू सरकारचे प्रमोशन होऊ दिले नव्हते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला होता.

या सर्व प्रकारानंतर मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काही सवाल केले आहेत. पुण्यानंतर नागपुरातीलही पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल राहुल गांधींना केले आहेत. अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)