आमदार द्वयींच्या कृपादृष्टीमुळे “रिंग’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आता सत्ताधारी भाजपची खासगी मालमत्ता असून, चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांच्या कृपादृष्टीमुळेच कोट्यवधींच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत केवळ तीन ते चारच ठेकेदार सहभागी होतात. याचे पुरावे हाती आले असून आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेवक मयूर कलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दोन्ही आमदारांवर आरोप करताना मयूर कलाटे यांनी संतपीठ व वाकडमधील विकास कामांचा संदर्भ दिला. संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत केवळ ठराविक तीनच ठेकेदार सहभागी झाले होते. तर प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख- वाकडमधील चार विकासकामांच्या निविदा प्रक्रियेची शनिवारी (दि. 5) मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीमधून या निविदा प्रक्रियेत सुनील अजवानी, एच. सी. कटारिया, कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि एस. एस. साठे हे केवळ चार ठेकेदार सहभागी झाले आहेत. या ठेकेदारांशिवाय अन्य कोणत्याही ठेकेदाराकडून निविदा भरण्याचा प्रयत्न झाल्यास, त्यांना दमदाटी केली जाते. या दोन्ही आमदारांच्या समर्थकांकडून धाकदपटशा केला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत दत्ता साने म्हणाले की, या चारही ठेकेदारांना दोन्ही आमदार व महापालिका अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे.त्यामुळे संगनमताने या निविदा भरल्या जातात. चार कामांच्या निविदांमध्ये हे चारच ठेकेदार सहभागी होत असल्याने, प्रत्येक काम वाटून वाढीव दराने घेतले जाते. शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशाची या दोन्ही आमदारांकडून उधळपट्टी केली जात आहे. शहरातील विविध विकासकामे काढण्याची शक्कलही हे ठेकेदारच देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

फेरनिविदा प्रक्रिया राबवा
संतपीठ आणि वाकडमधील निविदा प्रक्रियांमधील मर्यादित ठेकेदारांचा सहभाग हा या प्रक्रियेत केलेल्या “रिंग’चा ढळढळीत पुरावा आहे. याशिवाय आतापर्यंत भाजपच्या काळात राबविलेल्या सर्वच निविदा प्रक्रियेत या फक्त याच चार ठेकेदारांचा सहभाग आहे. त्यामुळे या दोन्ही निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याची मागणी मयूर कलाटे यांनी केली आहे. यापूर्वी देखील विविध विकास कामांमध्ये “रिंग’ झाल्याची बाब आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिली असताना देखील त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती कलाटे यांनी यावेळी दिली.

भांडार विभागाची चौकशी करा
निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरु केलेली निविदा प्रणाली स्वागतार्ह असली, तरी देखील यामधील अटी-शर्तीं नव्याने केलेला समावेश भ्रष्टाचाराला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या आहेत. भांडार विभागाचे अधिकारी आणि काही ठराविक ठेकेदार मिळून एकत्रिपणे निविदांची रचना करत आहेत. त्यामुळे एखाद्या निविदेत नवीन ठेकेदाराला सहभागी होता येणार नसल्याची अन्यायाकारक बाब समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार असलेल्या भांडार विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)