आमदार “जोडी’कडून स्वीकृत सदस्य “हायजॅक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभागातील एकूण 24 स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया गुरुवारी (दि.26) पार पडली. यामध्ये निष्ठावंतांना पुन्हा एकदा ठेंगा दाखवण्यात आला असून भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे वरचढ ठरले आहेत. 121 पात्र इच्छुकांपैकी निवड झालेल्या 24 सदस्यांपैकी केवळ चार सदस्य भाजपचे निष्ठावान आहेत. उर्वरित 20 सदस्य हे दोन्ही आमदारांचे समर्थक आहेत. त्यामुळे आमदार समर्थकांमध्ये “दिवाळी’ असताना निष्ठावंतांनी “शिमगा’ केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समितीवर 24 स्वीकृत सदस्यांची गुरुवारी (दि.26) निवड झाली. आठही प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे एकूण 24 जणांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. यापैकी बिभीषण चौधरी, देविदास पाटील, गोपीकृष्ण धावडे आणि वैशाली खाडे या भाजप निष्ठावंतांना न्याय मिळाला आहे. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर 121 इच्छुकांपैकी 24 जणांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली आहे.

भाजपची पालिकेत येऊन एक वर्षे पूर्ण झाले आहे. वर्षभरानंतर भाजपने स्वीकृत सदस्य निवडणूक घेतली आहे. भाजपला सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या पदावर संधी देण्यासाठी भाजपने स्वीकृत सदस्यपदाचा दोन वर्षाचा कालावधी निश्‍चित केला आहे. समाजकार्य करत असलेल्या बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींची वर्णी लागल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जात असला तरी सदस्यांच्या यादीवर नजर टाकली असता त्यात समर्थकांचाच भरणा असल्याने राजकीय पुनर्वसन असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे आमदार द्वयीच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवडणूक तिकीटे कापली, महापालिका स्वीकृत सदस्यपदातही तोंडाला पाने पुसली, किमान क्षेत्रीय समित्यांवर संधी मिळेल, अशी आस लावून बसलेल्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

आता लक्ष्य शिक्षण समिती
स्वीकृत सदस्य निवडीकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडीत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी आपले वर्चस्व राखले. आता शिक्षण मंडळाची मुदत संपल्यानंतर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण समितीमधील नगरसेवकांव्यतिरिक्त नामनिर्देशित नियुक्तीकरिता आता भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. तसा प्रस्ताव देखील मंजूर करुन तो राज्य सरकारच्या मान्यतेकरिता पाठविला आहे. या स्वीकृत सदस्य निवडनंतर आता शिक्षण समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“इ’, “क’कडे राष्ट्रवादीची पाठ
“मिनी महापालिका’ असा घटनात्मक दर्जा मिळालेल्या क्षेत्रीय समित्यांना राजकीय महत्त्व आहे. या समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्‍य असल्याने राजकीय दृष्ट्याही त्यांचे महत्त्व आहे. क्षेत्रीय समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. मात्र, समित्यांसाठी राष्ट्रवादीने निरुत्साह दाखवल्याचे पहायला मिळाले. “इ’ आणि “क’ प्रभागातील निवडणुकीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. तर, “फ’ प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता साने अनुपस्थित राहिले. उर्वरित नगरसेवकांनी भाजपच्या तिनही उमेदवारांना समर्थन दिले.

अशी झाली सदस्य निवड…
अ प्रभाग – राजेश सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे
ब प्रभाग – बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील
क प्रभाग – सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे
ड प्रभाग – चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप
इ प्रभाग – अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे,
फ प्रभाग – दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर
ग प्रभाग – संदीप गाडे, विनोद तापकीर, गोपाळ मळेकर
ह प्रभाग – अनिकेत काटे, कुणाल लांडगे, संजय कणसे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)