आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात 10 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार

आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे आ.गोरे यांचे प्रतिपादन

मुंबई : एका जमिनीच्या व्यवहारात भागीदारी मिळावी किंवा 10 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी खटाव माण मतदार संघाचे कॉंग्रेसचे आ. जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते विशाल बागल यांनी केल्याची तक्रार श्रीकृष्ण गोसावी यांनी पनवेल पोलिस ठाण्यात केली आहे. गोसावी यांनी या तक्रारीत ; आ.गोरे आणि बागल यांनी आपले अपहरण केल्याचे ही नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधींशी संबंधित ही तक्रार असल्याने तपासाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडे पाठवणयत आला असून गुन्हा दाखल करावा की नाही, याबाबत दुधे यांच्याकडे परवानगी मागितल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.दरम्यान.पोलिसांनी माझा रितसर जबाब घेतलेला आहे. माझ्यावर केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही, असे प्रतिपादन आ.जयकुमार गोरे यानी केले आहे.

तक्रारदार श्रीकृष्ण गोसावी यांच्या तक्रारी नुसार , त्यांनी नवी मुंबईत खारघर येथे कोयना प्रकल्पग्रस्त शेतक-यांकडून जमीन खरेदी केली आहे. गोरे यांचे कार्यकर्ते बागल यांनी वारंवार फोन करून गोसावी यांना भेटण्यासाठी बोलावले. भेटल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांच्यासोबत भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. नवी मुंबईत बागल यांच्यासोबत गोसावींची भेट झाली. तेथून बागल गोसावी यांना पुण्याला घेऊन गेले . पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे त्यांची आ.गोरे यांच्यासोबत भेट झाली. यावेळी आ. गोरे यांनी, तुम्ही विकत घेतलेल्या जमिनीमध्ये भागीदारी द्या किंवा रोख 10 कोटी रुपये द्या ,असे सांगीतले. त्यावर गोसावी यांनी , मी रितसर जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कशासाठी भागीदारी किंवा पैसे देऊ, असे आ.गोरे यांना विचारले. त्यावर गोरे यांनी, कायदा सगळा माझ्याकडे आहे. तहसिलदार दीपक आकडे हे माझ्या पक्षाच्या आमदारांचे जावई आहेत. तुमचा सातबारा मी होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्या जागेची परवानगी रद्द करून टाकेन. तुम्हाला व्यवहार पुढे सुरळीत करायचा असेल तर तुम्ही मला भागीदारी द्या किंवा रोख दहा कोटी रुपये द्या असे आ. जयकुमार गोरे मला म्हणाल्याने मी त्यांना सदर प्रस्तावाला नकार दिल्याचे गोसावी यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावर गोरे यांनी मला धमकी दिली की, मी काय धंदे करतो ते माहिती करून घ्या. तुम्ही रस्त्यावरून गाडीतून कसे सुखरूप जाता तेच मी पाहतो. मी घाबरून पैसे रोख नाहीतर चेकने देतो असे म्हणून निघून आलो. मी जयकुमार गोरे यांनी दिलेल्या धमकीला खूप घाबरलो असल्याने दुस-या दिवशी त्यांचे पीए बागल यांना दुपारी फोन करून कळविले की, मी कोटी रुपये सध्या चेकने देऊ शकतो, व समजुतीचा करारनामा करून सातबाराची दप्तरी नोंद झाल्यानंतर उर्वरीत रक्कम देईन. त्यावर त्यांनी मला आमदारांशी बोलून सांगतो असे कळविल्याचे गोसावी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

हे तर राजकीय षडयंत्र ; आरोपात तथ्य नाही – आ . जयकुमार गोरे
पनवेलमध्ये माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार राजकीय षडयंत्र आहे. राजकीय वजन वापरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे. फलटणकर रामराजे याबाबत चांगली माहिती देवू शकतील. माझी भूमिका आणि माझ्याकडे असणारे पुरावे मी योग्य वेळी मांडेन अशी प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
याविषयी अधिक बोलताना आ. गोरे म्हणाले, संबधित जमीन सरकारी आहे. त्या जमीनीबाबत गोसावी यांचे माझ्या मतदारसंघातील दोघांशी वाद झाले होते. अनेक लोक माझ्याकडे वयक्तिक तक्रारी घेऊन येतात. मी मध्यस्थी करावी अशी त्यांनीच विनंती केली होती. खंडणी मागणे, भागिदारी मागणे किंवा अपहरण करण्याचा प्रश्नच येत नाही. गोसावींनी फक्त तक्रार दाखल केली आहे. मी माझे म्हणणे पोलीसांसमोर मांडले आहे. माझ्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. हे राजकीय षडयंत्र आहे. मला अडकवण्यासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत . या प्रकरणी मला अडचणीत आणण्यासाठी मोठे राजकीय वजन वापरण्यात आले आहे. माझ्याकडे तसे पुरावेही आहेत. या तक्रारीची खरी वस्तूस्थिती काय आहे हे माझ्यापेक्षा फलटणकर रामराजे चांगले सांगू शकतात. माझी भूमिका मी योग्य वेळी मांडेन. विशाल बागल यांनीही गोसावी यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. यापूर्वीही अनेक वेळा मला अडकवण्यासाठी कुणी आणि किती प्रयत्न केले आहेत हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. माला राजकीय दृष्ट्या रोकण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र विरोधकांना त्यात यश येणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)