आमदारांनो, प्रश्न सोडवा अन्यथा पदाचा राजीनामा द्या

मागण्या नकोत, तर पुण्याला हक्काचे पाणी मिळावे


माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

पुणे – सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुण्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात आमदारांनी त्यासंबंधात मागणी करावी, अन्यथा आठही आमदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

“पुणेकरांच्या पाणी वापराबाबत गैरसमज पसरवले जाऊन पाणीवाटपात अन्याय केला जातो आहे. शहराला पाणी पुरविणाऱ्या चारही धरण क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस झाला आणि धरणातील पाणीसाठा 26 टीएमसी एवढा झाला. असे असताना ऐन दिवाळीत पाणीकपात करण्याची गरज नव्हती,’ असा आरोप जोशी यांनी केला आहे.

“दिवाळीत पाणीकपातीचा निर्णय झाल्याने भाजपच्याच खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष, हेवेदावे यानिमित्ताने बाहेर आले. या विषयात भाजप आमदारांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले,’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

“पुण्याला न्याय्य वाटा मिळावा, 200 एमएलडी पाणीकपातीला भाजप आमदारांनी कालवा समिती बैठकीत विरोध करायला हवा होता. तसे न करता भाजप सरकारने पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवर कायम ठेवली आहे. 1,600 एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात केली आहे. पुणेकरांची दिशाभूल करण्यासाठीचा हा “स्टंट’ आहे,’ असे जोशी यांचे म्हणणे आहे.

“निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आमदारांना पाण्याची आठवण झाली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातच पुणेकरांवरील पाणी कपातीची शक्‍यता दूर केली पाहिजे. मागण्यांपेक्षा पुणेकरांना ठोस निर्णय हवा आहे. जुलै-2019 पर्यंतचा पुण्यात कार्यक्रम निश्‍चित केला पाहिजे. पुण्यातील 45 लाख लोकांना दिलासा द्यायला हवा. शिवाय पुण्यातील सरासरी लोकसंख्येचा फेरअभ्यास करावा,’ असेही जोशी यांचे म्हणणे आहे.

24 तास पाण्याचे आश्‍वासन फसले
पुण्याच्या पूर्व भागाला भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी पुरविण्याची योजना होती. या सरकारला त्यात यश आलेले नाही. पाण्याची गळती थांबवण्यात अपयश आले आहे. पुणेकरांना 24 तास पाण्याचे आश्‍वासन दिले. यासाठी कर्जरोखे काढले, परंतु ही योजना फसली आहे, असा दावा जोशी यांनी केला आहे. एकेकाळी मुबलक पाणी असणाऱ्या पुणेकरांना आता हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे, ही दुर्देवाची स्थिती भाजपने आणली आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)