आमदारांनी खोटं बोलण्याचे धंदे बंद करावेत

विराज शिंदेंचा मकरंद पाटील यांच्यावर घणाघात : निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांची पत्रकबाजी
वाई, दि. 14 (प्रतिनिधी) -आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आ. मकरंद पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकबाजी करून मतदारसंघात विशेषतः वाई तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा करून जनतेची दिशाभूल केली आहे. शेंदुरजणे गणात एका दमडीचे ही काम झाले नसतानाही आमदार चमकोगिरी करीत असून आता तरी आमदारांनी खोटे बोलण्याचे धंदे बंद करावेत, असा घणाघात जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यात पेयजल योजनांसाठी 22 कोटी रुपये, रस्ते विकास कामांसाठी 32 कोटी मंजूर केल्याचा दावा केला होता. आ. पाटील याचा दावा कसा फसवा आहे, यासंबंधीचे शेंदुरजणे गणात पाठपुरावा करून मंजूर केलेल्या विकास कामांची यादीच शिंदे यांनी पत्रकारांना दाखवली. पेयजल योजनेअंतर्गत मांढरदेव, बालेघर, वेरूळी, परखंदी, धावडी अंतर्गत वाघमाळ, रेणुसे वस्ती, चौधरी वस्ती आणि बोपर्डी आदी गावे टँकरमुक्त करण्यासाठी पंचायत समिती सदस्या सौ. ऋतुजा शिंदे यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात मांढरदेवसाठी धोम धरणातून पाणी पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी 66 लाख 50 हजार रुपये निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. तसेच परखंदी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेमार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे 48 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. बालेघरसाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या, माध्यमातून सुमारे 43 लाख धावडी अंतर्गत वाड्या-वस्त्यांसाठी 15 लाख बोपर्डी योजनेसाठी 45 लाख रुपये निधीचे प्रस्ताव पाठविले होते. मात्र या पेयजल योजनांसाठी निधी मंजूर करून आणल्याचा कांगावा आ. पाटील करीत आहेत. या सर्व कामांसाठी पंचायत समिती सदस्या या नात्याने ऋतुजा शिंदे यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार केला असून आमदारांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाणा असल्याची टीका विराज शिंदे यांनी केली. रस्ते विकासासाठी आमदारांनी जाहीर केलेल्या पत्रकात धोम-अभेपुरी- वेरूळी – मांढरदेव या रस्त्यांसाठी 40 लाख रुपये तसेच त्याच रस्त्यांसाठी पुन्हा 25 लाख रुपये मंजूर केल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. मात्र जिल्हा परिषद मार्फत 50-54 योजने अंतर्गत या रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी सुमारे 33 लाख 93 हजार रुपये इतके बिल अदा झाल्याचे म्हटले आहे. दरवर्षी एकाच रस्त्यावर किती वेळा आणि कसा निधी आणला जातो? असा संतप्त सवाल शिंदे यांनी केला आहे.
याच पद्धतीने जिल्हा परिषदेमार्फत 30-54 योजनेअंतर्गत भोगाव, पांडेवाडी, वरखडवाडी, गाढवेवाडी, अभेपुरी या रस्त्यांसाठी 38 लाख रुपये तर गुळुंब – खानापूर रस्त्यांसाठी 38 लाख मंजूर झाले असून त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगत या रस्त्यांवर पुन्हा पुन्हा निधी टाकल्याचे आमदारांच्या पत्रकात स्पष्ट दिसून येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मांढरदेव बालेघर, चोराची वाडी या रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पंचायत समिती सदस्य ऋतुजा शिंदे यांनी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. 3 कोटी 12 लाख इतका निधी प्रस्तावित केलेल्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळवून त्याची पहिल्या टप्प्यातील चार किलोमीटरचे काम सुरू असल्याची माहिती देत या कामांचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न आ. पाटील करत आहेत. खोट्या वल्गना करणार्‍या आमदारांनी या कामासंदर्भात समोरासमोर चर्चेस येण्याचे आव्हान शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

शेंदूरजणेत दमडीचे काम नसताना चमकोगिरी
पंचायत समिती मार्फत शेंदुरजणे गणात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याबाबतचा सर्व पत्रव्यवहार आमचेकडे उपलब्ध आहे. मात्र, ज्या कामांसाठी आमदारांनी कसलाच पाठपुरावा केलेल्या नसतानाही पोकळ पत्रकबाजीद्वारे चमकोगिरी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)