आमदारसाहेब न केलेल्या कामांचे श्रेय लाटू नका

श्रीमंत ढोले यांचे टिकास्त्र : लाखेवाडीतील श्रेयवाद उफाळला

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील लाखेवाडी गावची विकासकामे कोण मंजूर करीत आहे, हे जनतेला माहिती आहे. परंतु आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपण लाखेवाडी गावची कामे मंजूर न करता कोणताही पाठपुरावा न करता ही कामे आपण मंजूर केल्याचा आव आणीत आहेत, असा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी केला.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासनाच्या तांडा योजनेतून इंदापूर तालुक्‍यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती विशेष पत्रकार परिषद घेऊन दिली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी आमदार भरणे यांचा पोलखोल केला आहे. ढोले म्हणाले की, ग्रामपंचायत लाखेवाडीमधील निवडणुकीमध्ये दिलेला जाहीरनामा खरा ठरवत लाखेवाडी गाव स्मार्ट दिशेने वाटचाल करीत आहेत. अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम, वन, ग्रामविकास, पर्यटन आदी खात्यामधून गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. हा निधी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून लाखेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक विकासकामांना दिला जात आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे येत आहे.त्यामुळे आमदार भरणे यांनी न केलेल्या कामाचे श्रेय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गावातील लोकांना खरं काय आणि खोटं काय माहित आहे. त्यामुळे जे आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याच, असे म्हणावे, असा टोला त्यांनी भरणे यांनी लगावला. ढोले म्हणाले की, गावातील देवदेवतांचे सभामंडप, कळकाई माता मंदिर सभागृह, ढोले मळा भवानी माता मंदिर सभागृह, लाखेवाडी गावठाण व वाड्या – वस्त्यांवरील रस्ते, पाणी विजेची व्यवस्था, झाडे लावणे आदी कामे गावामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच येत्या काही काळामध्ये जय भवानी माता मंदिर व विठ्ठल टेकडी मंदिर या मंदिरांचा कायापालट होऊन पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. पिठेवाडी येथील नीरा नदीवरील बंधारा दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधींची उपलब्धता येणाऱ्या काही काळामध्ये होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)