आमच्या लोकशाहीत… 

शेतकरी आणि कामगारच हुतात्मा होताना दिसतात. आत्महत्या पण पिचलेल्या मनाचे शेतकरी आणि कामगारच करतात, आणि त्याचं भांडवल राजकारणी करतात, कशासाठी? निवडणुकांसाठीच ना! मोठे लोक, राजकारणी, व्यापारी, कारखानदार असे मोठे मासे शेतकरी, कामगार अशा लहान माशांना खाऊन टाकतात. मराठी माणसा, मुंबई महाराष्ट्रात आहे पण खरोखरीच मुंबई मराठी माणसाची आहे का? माझी मराठी माणसं मला झोपडपट्टीच शहर करण्यापेक्षा झोपडपट्टीविरहित मुंबई बनवतील का? हुतात्मा चौकात एक शेतकरी आणि कामगार यांचा पुतळा उभा केला आहे, का? कष्टकरी शेतकरी व कामगार सधन होऊन ट्रॅक्‍टरवर बसून शेती करतो आहे, असा पुतळा का नाही? कामगार कार्यकारी मंडळाबरोबरच काम करतानाचा पुतळा का नाही?

आपला देश लोकशाहीचा आहे, आमच्याच माणसांना, पुढाऱ्यांना तसं नकोय. यामागे लोकशाही राजकारण आहे. जर शेतकरी सधन झाला, कामगार कार्यकारी मंडळात बसला तर राजकारण संपलेच समजा. म्हणून आम्ही सर्व सत्तेसाठी झुंजतो व शेतकरी शेतातच राबला पाहिजे, कामगार कारखान्यातच हात काळे करून घाम गाळताना दिसला पाहिजे, हीच लोकशाही! लोकशाही लोकांसाठी का पुढाऱ्यांसाठी? लोकशाहीत ही विषमता आमच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या नेत्यांनी शिकवली का? आम्ही विधानसभेत, लोकसभेत पांढरे शुभ्र कपडे घालून अक्षरश: शाब्दिक मारामाऱ्या का करतो? तर सत्तेसाठीच. शेतकरी काबाडकष्ट करत असतो, कामगार घाम गाळत असतो. तरी पण आम्ही लोकशाहीच्या अशा पद्धतीमुळे रडत नाही. पण आम्हाला लोकशाहीत विशिष्ट दर्जा हवा. हा लढा तुम्ही मान्य केलाच पाहिजे.
– गोपाळ द. संत, पुणे 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)