पटना : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. दरम्यान, पाकला भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तरदेखील देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी वक्तव्य केले. पाकिस्तानकडून वारंवार भारतात धार्मिक विद्वेष पसरवला जात आहे. सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, याची काळजी करु नका कारण त्यांना पुन्हा जागेवर आणण्याची आपल्यात धमक आहे, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकला इशारा दिला आहे.
बिहारमधील पटना येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.पाकिस्तानला इशारा देताना राजनाथ म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करु नका. कारण, भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी बलिदान दिले तसेच अश्फाकउल्लाह खान यांनी देखील भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. पाकिस्तानकडून कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही देशाचे शिर कधीही झुकू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात देशवासियांना उद्देशून दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा