आमची आणि त्यांची संस्कृती…

हेमंत देसाई

पाकिस्तानची ‘संस्कृती’ वेगळी आहे. वारंवार खोटारडेपणा करणे, शब्द फिरवणे, आश्‍वासनांचा भंग करणे, अतिरेक्‍यांच्या टोळ्या तयार करणे यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही. भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे यात त्यांना किंचितही लाज वाटत नाही.

‘डिअर टू बिहोल्ड : ऍन इंटिमेंट पोर्ट्रेट ऑफ इंदिरा गांधी’ या आपल्या पुस्तकात कृष्णा हाथीसिंग यांनी एक आठवण सांगितली आहे. ती अशी…भारताची फाळणी विलक्षण यातनादायी होती. संजय गांधींच्या जन्मानंतर इंदिरा गांधींच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. प्रकृती बरी नसतानाही संजयच्या संगोपनाची आवश्‍यक ती व्यवस्था करून, इंदिरा गांधींनी निर्वासितांच्या छावण्यांना भेटी देण्याचा धडाका लावला. पाकिस्तान तेव्हा नव्यानेच जन्मला होता.

हिंदूंच्या विरोधात तिथे दररोज हिंसक हल्ले सुरू असल्याच्या बातम्या यायच्या. त्याची प्रतिक्रिया मग दिल्लीतही उमटायची. दिल्लीतील मुस्लीम वस्त्यांवरही हिंसक हल्ल्यांची लाट आली. एका गरीब मुस्लीम कुटुंबाच्या घराला बेभान जमावाने वेढा घातला. “घरातील सर्वांना अल्लाकडे धाडू’, अशा धमक्‍या हा जमाव देऊ लागला. ही घटना समजताच, इंदिराजी वेगाने घटनास्थळी पोहोचल्या. त्या मुस्लीम कुटुंबाला धीर देत त्या म्हणाल्या, “अजिबात घाबरू नका. माझ्या मागे या.’ घराबाहेरच्या संतप्त हिंदू जमावाने त्यावेळेस इंदिराजींना शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र एकाचीही त्यांना थांबवण्याची हिंमत झाली नाही. मुस्लीम कुटुंबाला मानसिक आधार देत, इंदिराजींनी त्यांना आपल्या जीपमध्ये बसवले आणि थेट आपल्या पित्याच्या घरी घेऊन गेल्या.

ही आपल्या भारताची संस्कृती आहे. येथे गंगा-जमुना तहज़ीब आहे. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्‍चन, पारसी, जैन, बौद्ध हे सर्वजण येथे गुण्यागोविंदाने नांदतात. धर्माच्या आधारे येथे भेदभाव केला जात नाही. पाकिस्तानने अनेकदा भारतावर आक्रमण केले. त्या प्रत्येक वेळी भारताने पाकचे थोबाड रंगवले. परंतु त्याचवेळी पाकिस्तानी लेखक, कलावंत भारतात आल्यास, त्या त्या वेळच्या सरकारने त्यांचे स्वागतच केले व त्यांना संरक्षणही पुरवले. मृत्युशय्येवरील पाकिस्तानी रुग्णांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज येथे वैद्यकीय उपचारांची सोय उपलब्ध करून देतात. भारतात कसाबवरील खटलाही लोकशाही मार्गाने चालवला जातो. देशद्रोही याकूब मेमन याचाही योग्य तो न्याय कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही इथल्या न्यायालयात हजर केल्यावर, त्यांना वकिली साह्य उपलब्ध करून दिले जाते. अनेक वर्षांपासून एकमेकांना दुरावलेल्या आणि भेटीसाठी आतुर असलेल्या नातलगांना एकत्र येता यावे, म्हणून आपण व्हिसाही उपलब्ध करून दिला आहे.

मात्र पाकिस्तानची “संस्कृती’ वेगळी आहे. वारंवार खोटारडेपणा करणे, शब्द फिरवणे, आश्‍वासनांचा भंग करणे आणि अतिरेक्‍यांच्या टोळ्याच्या टोळ्या तयार करणे, यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही. हेरगिरीच्या आरोपावरून तुरुंगात ठेवण्यात आलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पाकने अमानुष वागणूक दिली आहे. कुलभूषणला निर्दयपणे मारहाण करण्यात आली असून, तशा खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसल्या. शिवाय त्याच्या आई व पत्नीला सौभाग्यालंकार काढूनच त्याची भेट घ्यावी लागली. भारतीयांचा धार्मिक व सांस्कृतिक भावनांना जाणीवपूर्वक धक्का देण्याचाच हा प्रकार होता. भारताने याचा निषेध केला असला, तरी पाकिस्तान सुधारण्याची कोणतीही शक्‍यता नाही.

सन 2018 पाकिस्तानमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत भारताशी सहकार्य वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न पाक सरकार करण्याची सुतराम शक्‍यता नाही. कारण तसे केले, तर आपली मते कमी होतील, अशी भीती सत्ताधारी पक्षास वाटते. शिवाय त्यामुळे लष्कर व आयएसआयचा प्रक्षोभ होईल, ही त्यांची भीती असते. मध्यंतरी नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना सत्तेवरून घालवण्यात आले. त्यांच्या चौकशीसाठी न्यायालयाने नेमलेल्या तपास पथकात गुप्तचर खात्यातील दोन ब्रिगेडियर्सचा समावेश होता. अर्थातच आयएसआय व लष्कराच्या गुप्तचर खात्यानेच त्याची नेमणूक तेथे करवली होती. त्यांच्या माध्यमातून शरीफ यांच्याविरुद्ध केस तयार करून, त्यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान श्रीमंत असणे यात काही नवीन नाही. नवाझ शरीफ यांच्या लंडन व दुबईत मालमत्ता आहेत. मात्र शरीफ यांचे वडील मियॉं मुहम्मद शरीफ हे स्टील मॅग्नेट म्हणून प्रसिद्ध होते.

तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी मियॉं शरीफ यांच्या सर्व मालमत्तांचा सरकारमार्फत ताबा घेतला. त्यांच्या जमिनी, इमारती वगैरे परत करण्यात आल्या, तेव्हा पाकच्या अध्यक्षपदी झिया-उल-हक आले होते. भुत्तो यांना त्यांनी फासावर लटकवले होते. बेनझीर भुत्तो यांचे ब्रिटनमध्ये 350 एकरात 30 खोल्यांची एक मॅन्शन होते. दुबईला त्यांचा 10 हजार चौरस फुटांचा व्हिला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुखर्रफ निवृत्त झाले, तेव्हा त्यांना दोन कोटी रुपयांचा निवृत्ती लाभ मिळाला. मात्र निवृत्तीनंतर महिन्याभरातच त्यांनी लंडन व दुबईमध्ये 40 कोटी रुपयांचे फ्लॅट्‌स विकत घेतले.

बेनझीर भुत्तो यांच्या खुनात मुशर्रफ यांचा हात असल्याचाही आरोप होता. परंतु “भ्रष्टाचार व खुनाचा कट यावरून त्यांना शिक्षा केल्यास, खबरदार’, असा दमच तत्कालीन लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी दिला. त्यावेळी मुशर्रफ निवृत्त झाले होते. प्रमुख विरोधी नेते इमरान खान यांचा लंडनमध्ये एक शाही फ्लॅट आहे. एका ऑफशोअर कंपनी मार्फतच त्यांनी तो घेतला असून, कर चुकवण्यासाठीच त्यांनी हे केले आहे. परंतु इमरान यांना लष्कराचे पाठबळ आहे. लष्कराच्या आशीर्वादानेच ते नवाझ शरीफविरोधी महामोर्चे काढत होते. झिया-उल-हक यांनी लष्करी अधिकाऱ्यांना कट्टर इस्लामी बनवले. लाचखोरी व भ्रष्टाचार करताना मात्र त्यांच्यात धर्म आड येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)