आप्पामहाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक

गोंदवले बुद्रुक ः आप्पा महाराज समाधी मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी. (छाया ः संदीप जठार)

गोंदवले, दि. 28 (प्रतिनिधी)- श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे बालमित्र आप्पा महाराज यांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त आज गोंदवल्यात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
गोंदवल्यातील फडतरे कुटुंबातील आप्पासाहेब महाराज हे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे बालमित्र होते. श्री महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी आप्पा महाराजांचे निर्वाण झाले होते. त्यामुळे आप्पा महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीच केली होती. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा गोंदवल्यात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. गोंदवल्यातील मुख्य चौकातील आप्पा महाराजांच्या समाधी मंदिरात पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास रघुपती राघव राजाराम व ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात श्रींच्या पादुका व प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीच्या ग्रामप्रदक्षिणेनंतर दुपारी समाधीस्थानी मुख्य गुलालाचा कार्यक्रम झाला. ह.भ.प.अशोक महाराज पोळ यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ह. भ. प. जगन्नाथ महाराज खरात यांच्या भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी वाघमोडेवाडी,काळेवाडी व कचरेवाडी येथील गजी मंडळांनी गजीनृत्य सादर केले. रात्री भंडाऱ्याच्या कार्यक्रमाने पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)