आपल्या मुलींना न्याय मिळणार, पण कधी ?

राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना सवाल
नवी दिल्ली – कठुआ आणि उन्नाव येथील दोन बलात्कार प्रकरणावरून संपुर्ण देशात वादंग माजले असताना त्यावर काल प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडत आपल्या मुलींना न्याय मिळेल असे वक्तव्य केले आहे. त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा मोदींना सवाल करणारा ट्‌विटर संदेश प्रसारीत केला आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रिय पंतप्रधान या प्रकरणावरून मौन सोडलेत याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्या मुलींना न्याय मिळेल असे तुम्ही म्हणाला आहात पण कधी? असा सवाल त्यांनी यात उपस्थित केला आहे. तत्पुर्वी कॉंग्रेस पक्षातर्फे या प्रकरणी प्रतिक्रीया देताना अभिषेक सिंघवी म्हणाले की मोदींनी ही त्रोटक प्रतिक्रीया व्यक्त करून अत्यंत अल्प आणि उशिराची कृती केली आहे.

उत्तरप्रदेश आणि जम्मू काश्‍मीर मधील या बलात्कार प्रकरणात पंतप्रधान आता काही ठोस उपाययोजना करतील आणि यातील पीडित परिवाराला न्याय मिळवून देतील अशी आमच्या पक्षाला खात्री आहे. ते म्हणाले की बलात्काराची ही दोन प्रकरणे साऱ्या देशासाठी लाजीरवाणी ठरली आहेत. या घटनांना भाजप धार्मिक रंग देण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे असेही त्यांनी म्हटले आहे. यावर पंतप्रधानांनी केवळ शब्दांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांचे शब्द कृतीत परावर्तीत होतील अशी आम्हाला खात्री आहे. नुसत्या घोषणा आणि जुमलेबाजीने उन्नाव आणि कठुआ मधील तणाव निवळणार नाही असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)