आपल्या मित्रांच्या मदतीसाठी पुढे आले चिमुकले हात

माळीवाडा शाळेने जपला सामाजिक बांधिलकीचा वसा

शेवगाव – या आठवड्यात आम्ही खाऊ खाणार नाही.. माझ्याकडे 20 रुपये आहेत.. माझे 10 रुपये घ्या.. माझ्या वाढदिवसाचे आलेले 100 रुपये मी देते..असा मदतीचा हात माळीवाडा जि.प. शाळेतील चिमुकल्यांनी पुढे करत तासभरात एक हजार रुपये जमा करून निंबोडी दुर्घटनेतील जखमी चिमुरड्यांना देण्याचा निश्‍चय केला.

नेहमीप्रमाणे परिपाठात शाळेचे मुख्याध्यापक गणपत दसपुते यांनी निंबोडी शाळेचे छत कोसळून 3 मुलांचा मृत्यू झाला, तर 13 मुले गंभीर जखमी झाली असून ती नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही शाळा आपल्या शाळेसारखी शाळा आहे. अशीच गरिबांची मुले तेथे शिक्षण घेत आहेत ही बातमी सर्व मुलांनी लक्षपूर्वक ऐकून हळहळ व्यक्‍त करत प्रश्‍न विचारले. तिसरीचा गौरव डाके म्हणाला, “”सर, या मुलांच्या दवाखान्यासाठी मी माझे खाऊचे पैसे देतो.” तर, “”मी माझ्या वाढदिवसाचे पैसे देते,” असे चौथीत असणारी श्रावणी उगले म्हणाली. असे करत शाळेतील सर्व मुलांनी आपले खाऊचे पैसे जमा केले. तासभरात एक हजार रुपये जमा झाले.

जमा झालेली ही रक्कम शिक्षण विस्ताराधिकारी शैलजा राऊळ यांच्याकडे मुख्याध्यापक दसपुते, सुनंदा सातपुते, संजीवनी झिरपे यांनी सुपूर्द केली. यावेळी शाळेच्या या उपक्रमाचे राऊळ यांनी कौतुक केले, तर आपत्ती व्यवस्थान म्हणजे काय? पूर येणे, आग लागणे, भूकंप या नैसर्गिक आपत्तीची माहिती मुलांना राऊळ यांनी दिली. माळीवाडा शाळेने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, केंद्रप्रमुख अलका साखरे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)