आपले सैनिकच समाजातील खरे हिरो

 

अनुराधा प्रभुदेसाई : लक्ष्य फाउंडेशनतर्फे मॉर्डनमध्ये युवा प्रेरणा कार्यक्रम

पुणे  – हल्ली तरुणाईला ‘प्रेग्नंसीनंतर ऐश्‍वर्याचे वजन किती कमी झाले’, हे माहित असतं. परंतु, परमवीर चक्र मिळणाऱ्या जवानांची नावे माहिती नसतात. देशाचे खरे हिरो ते आहेत, हे आपण सतत विसरतो. मात्र याची माहिती पुढच्या पिढीला देणे ही माझ्या पिढीची जबाबदारी आहे, असे मी मानते. असे मत लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्‍त केले.

लक्ष्य फाउंडेशनतर्फे मॉर्डन महाविद्यालयातील सभागृहात शुक्रवारी युवा प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांच्यासहित मॉर्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रभुदेसाई यांनी मेजर गौरव गोडबोले व लेफ्टनंट कर्नल रणजितसिंह नलावडे यांची मुलाखत यावेळी घेतली.

यावेळी प्रभुदेसाई यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भारताच्या सीमाभागांविषयी माहिती सांगितली. तसेच कशा परिस्थितीत जवानांना तेथे काम करावे लागते, याचेही सादरीकरण केले. प्रभुदेसाई म्हणाल्या, सैनिकांना कोणत्या दिव्यातून जावे लागते, याची अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते. या पिढीकडून माझी एवढीच अपेक्षा आहे, की त्यांचे काम जाणून घ्या. त्यांच्या कामाचा गौरव करा, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना, त्यांच्या आईवडिलांना केवळ एवढा विश्‍वास द्या, की आम्ही तुमच्या सोबत आहोत.

गौरव गोडबोले म्हणाले, मी पुण्यातल्या बीएमसीसीमध्ये शिकलो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये गेल्यानंतर मला पहिल्या काही दिवसांतच तेथील शिस्तीचा अंदाज आला. पहिल्याच दिवशी हॉकी स्टिकने खाल्लेला मार, उलटे लटकवून शिस्त दिली गेली. आपण पुढे जाऊन जीवनात सैन्यात भरती व्हाल, किंवा नाही. परंतु एक जबाबदार नागरिक बना. धर्माचे लेबल लावून व्यक्‍तींकडे न पाहता माणूस म्हणून बघा.

तर रणजितसिंह नलावडे म्हणाले, आपल्या देशातील काही लोक त्यांच्या अज्ञानामुळे दुसऱ्या देशाचे सैनिक झाले होते. त्यांना मी भारतात परत आणू शकलो, हे माझ्यासाठी खूप मोठे यश होते. कधीही हार न मानने हे धेय घेऊनच मी पुढे गेलो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)