आपली गुंतवणूक महागाईवर मात करते का?

गुंतवणूक का केली पाहिजे, असा प्रश्‍न अनेक जणांना पडतो. त्याचे उत्तर आहे, पैशांची किंमत चलनवाढीमुळे कमी होत जाते, त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पैशातील काही
पैसा भविष्यात वाढण्यासाठी ठेवणे, याला पर्याय नाही. त्यालाच गुंतवणूक म्हणतात – जी एखादे रोप लावण्यासारखी असते.

गुंतवणूक करताना मिळणारा परतावा किती मिळणार आहे, हाच प्रामुख्याने कळीचा मुद्दा गुंतवणूकदाराच्या मनात असतो. परतावा किती मिळणार आहे याचा अंदाज घेत असताना या परताव्यावर आकारला जाणारा कर व महागाईच्या वाढीचा दर याचाही विचार केला पाहिजे. गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदार चोखाळत असतात. केवळ मिळणारा परतावा निश्‍चित स्वरुपाचा आहे व तो स्पष्टपणे लिहून दिला आहे एवढीच बाब पुढील काळात पुरेशी ठरणारी नाही. बॅंकेतील मुदत ठेव, पोस्टातील विविध योजना, पीपीएफ इत्यादी पर्यायांमधील व्याजदर दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. म्हणून सर्व रक्कम अशा स्वरुपाच्या योजनांमध्ये गुंतवणे योग्य ठरणार नाही.

कर पश्‍चात उत्पन्न किती हा फार महत्त्वाचा मुद्दा बहुतांश वेळा गुंतवणूकदार विचारतच घेत नाहीत. अशावेळी आपली गुंतवणूक महागाई आणि कर यांच्या वजावटीनंतरही वृद्धिंगत होत रहावी असे वाटत असल्यास इक्विटी अथवा इक्विटी आधारीत म्युच्युअल फंड योजनांमध्ये आपली काही रक्कम गुंतवणे ही काळाची गरज आहे. यामुळे महागाई दरावर मात करणे गुंतवणूकदारास शक्‍य होणार असते.

आपण केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा तपासताना यावर आकारला जाणारा कर हा निश्‍चितपणे विचारात घेतला पाहिजे. उदा. ठराविक व्याजदराची हमी देणाऱ्या एका गुंतवणूक पर्यायांमध्ये वार्षिक 8 टक्के व्याजदर मिळणार असेल व महागाई दर प्रत्यक्षात 7 टक्के असल्यास गुंतवणूकदारांच्या हाती करमुक्त परतावा केवळ 1 टक्का मिळत असतो. याचे गणित बहुतांश गुंतवणूकदार विचारात घेत नाही. असे गुंतवणूकदार या गुंतवणुकीतून कोणतीही कमाई करत नाही हेच सिद्ध होते. महागाई दर व कर यांच्या वजावटीनंतर हाती नेमके किती उत्पन्न राहिले याचा नेमका विचार केल्यास गुंतवणूक आहे तितकीच राहिली अथवा प्रसंगी तिचे मूल्य कमी झालेले आहे असेच म्हणावे लागेल.

आजपासून वीस वर्षांपूर्वी एक क्विंटल तांदळाची सरकारी दराप्रमाणे रु. 490 प्रमाणे विक्री होत होती. आज तीच रक्कम प्रतिक्विंटल 4500 रु. दराने होत आहे. याचाच अर्थ असा की, गेल्या वीस वर्षात तांदळाच्या दरामध्ये जवळपास दहापटीने वाढ झाली आहे. याच वेगाने आपली गुंतवणूकही किमान वाढणार आहे का, याचाही अभ्यास गुंतवणूकदाराने करणे महत्त्वाचे आहे.

आज गुंतवणूक करत असताना भविष्यात वाढणारी महागाई व गुंतवणुकीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर याचा योग्य अंदाज बांधूनच योग्य पर्यायाची निवड करणे आवश्‍यक आहे. जर आपला अंदाज चुकला तर गुंतवणुकीमधील वेळ निघून जाते आणि गुंतवणूकदाराच्या हाती काहीच परतावा शिल्लक राहिलेला नसतो. (रिअल रिटर्न) म्हणजेच निव्वळ परतावा नेमका किती मिळणार आहे, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडक्‍यात भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि गुंतवणुकीचा अपेक्षित परतावा यांचा मेळ घालताना गुंतवणूकदाराच्या दैनंदिन खर्चातील महागाई दरामुळे अथवा चलनवाढीमुळे होणारी वाढ तसेच आकारले जाणारे कर यांचा विचार न केल्यास आपली आर्थिक गणित बिघडणार आहेत.

उदा. मासिक खर्च रु. 25,000 असल्यास चलनवाढीच्या दरात एक टक्क्‌याने जरी फरक पडला तरी भविष्यातील घरखर्चावर फार मोठा परिणाम होत असतो.
मासिक घरखर्च आणि महागाईवाढीचा दर

पुढील तक्‍त्यात सांगितल्याप्रमाणे जर खर्चावर महागाई दराचा परिणाम केवळ एक टक्का दरात बदल झाल्यास होणारा परिणाम फार मोठा होत असेल तर आपल्या रुपयाचे मूल्यही येणाऱ्या काळात वेगाने कमी होणार आहे.

गुंतवणूकदाराचे आजचे रु. 100 याचे मूल्य 2028 पर्यंत केवळ रु. 55.80 राहणार आहे.
यामुळेच जर भविष्यात महागाई दराचा फार मोठा परिणाम आपल्या रुपयाच्या मूल्यावर, खर्चावर व भविष्यातील व्याजदरांवर होणार असेल तर गुंतवणूक करत असताना किमान उत्पन्नाच्या 25 ते 30 टक्के उत्पन्न 12 ते 15 टक्के व्याजदर देणाऱ्या, दीर्घकालीन परतावा देणाऱ्या इक्विटी आधारित म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. म्युच्युअल फंडाच्या योग्य पर्यायाची निवड करत असताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्यास भविष्यात मिळणारा परतावा अपेक्षेप्रमाणे मिळू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)