आपला फोन चोरीचा तर नाही ना ?

मोबाईल चोरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी, बसस्थानक, लोकल, रेल्वेस्थानक आदी गजबजलेल्या ठिकाणी चोरटे हमखास महागडा मोबाईल मारण्यात तरबेज असतात. अशा मोबाईल चोरांच्या मुसक्‍या बांधण्याचे काम पोलिसांकडून होत असले तरी हे मोबाईल चोर देशात-परदेशात मोबाईल विकून मोकळे होतात. त्यामुळे आपण खरेदी केलेला सेकंड हॅंड मोबाईल कदाचित चोरीचा देखील असू शकतो. अशा शक्‍यतेपासून वाचण्यासाठी दूरसंचार विभागाने एक यंत्रणा विकसित केली असून त्यामुळे खरेदी केलेल्या मोबाईलची स्थिती जाणून घेण्यास मदत मिळते.

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने एक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यंत्रणेच्या मदतीने मोबाईल चोरीचा तर नाही ना हे शोधणे सोपे जाणार आहे. एखादा जुना मोबाईल खरेदी करताना ही यंत्रणा फायद्याची ठरू शकते. यासाठी ग्राहकाला दूरसंचार विभागाची हेल्पलाईन 14422 वर एक संदेश पाठवावा लागेल. यानंतर काही क्षणातच आपण खरेदी केलेला मोबाईल हा चोरीचा आहे की नाही, हे समजू शकेल. चोरीचे वाढते प्रमाण आणि बदलण्यात आलेले मोबाईल इक्‍युपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) च्या माध्यमातून वाढते गुन्हे आणि दहशतवादी कारवाया पाहता सरकारने हा मार्ग काढला आहे. या तंत्रामुळे अनोळखी व्यक्तीकडून चोरीचा मोबाईल खरेदी होण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. चोरीचे मोबाईल कमी किमतीत विकले जातात आणि आपणही त्यास भरीस पडतो. परंतु पोलिसांच्या कारवाईनंतरच आपला मोबाईल चोरीचा असल्याचे समजते.

हेल्पलाईनची मदत
एखाद्या ग्राहकाला सेकंड हॅंड मोबाईल खरेदी करायचा असेल तर 14422 वर केवायएम (आएमइआय नंबर) संदेश पाठवावा लागेल. या संदेशाच्या उत्तरातून आपला मोबाईल कसा आहे, हे स्पष्ट होईल. मोबाईलचा आयएमइआय नंबर बदलला तर नाही ना, हे कळेल. त्याचबरोबर मोबाईलची उत्पादक कंपनी कोणती आहे, हे देखील स्पष्ट होईल. सेंकड हॅंड मोबाईलमधील आयएमइआय हा एखाद्या ब्रॅंडला किंवा मॉडेलला सपोर्ट करते. पंधरा आकडी आयएमइआय नंबर हा कंपनी आणि मॉडेलनिहाय वेगळा असतो. तसे म्हटलं तर हे हॅंडसेटचे ओळखपत्र आहे, असे समजावे. चोरी किंवा अन्य मार्गाने आणलेल्या मोबाईलचा आयएमइआय नंबर चोरट्यांकडून बदलला जातो. अशा मोबाईलच्या खरेदीने अनोळखी व्यक्ती अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच ग्राहकाने *#06# डायल करून आपल्या मोबाईलचा आयईएमईआय क्रमांक जाणून घेऊ शकता.

बेकायदा मोबाईल काम नाही करणार
मेसेजशिवाय सी-डॉटचे बंधन अॅपसुद्धा विकसित करण्यात आले असून त्याची सध्या चाचणी सुरू आहे. हा ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र सध्या हा ऍप सेवा देत नाही. आगामी काळात या माध्यमातूनही सेकंडहॅंड मोबाईलची सत्यता जाणून घेण्यासही हातभार लागणार आहे. दूरसंचार विभागाच्या निर्देशानुसार केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील सी-डॉटने सुरू केली आहे. संपूर्ण देशात ही व्यवस्था डिसेंबरपर्यंत लागू होऊ शकते. त्यानंतर बेकायदा मोबाईल मोबाईल नेटवर्कवर चालणार नाहीत. आतापासूनच त्याची चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एकाच आयएमइआय नंबरने देशात 18 हजार मोबाईल वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेक्षणातून उघडकीस आल्यानंतर मंत्रालयाने सी-डॉटचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

आयएमइआय बदलल्यास तीन वर्षे शिक्षा
आयएमइआय बदलल्यास तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद सरकारने केली आहे. आयएमइआयशी छेडछाड करणाऱ्याविरुद्ध पोलिस आणि कंपनी दंडात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करू शकते.

– विनायक सरदेसाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)