आपत्ती विभाग “नॉट रिचेबल’

अग्निशमन केंद्रावर मदार : महापालिका प्रशासन सुस्त

पिंपरी – शहरात संततधार सुरू असून, गेल्या चोवीस तासात एकूण 53 मिमी पाऊस झाला आहे. तर, 1 जूनपासून आत्तापर्यंत 1 हजार 572 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारपर्यंत पावसाची अशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पावसामुळे रहिवाशांना अन्यत्र हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभाग तैनात असला. तरी, आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीच हालचाल नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षातून फोन उचलला जात नाही. तसेच अधिकारीही “नॉट रिचेबल’ असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे केव्हाही पूर परस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्या मुळे अग्निशमन दलाचे जवान तिन्हही पाळामध्ये काम सुरू आहे. अग्निशमन विभागाची वेळोवेळी त्यावरवर देखरेख सुरू आहे. मात्र, आपत्ती विभागाकडून त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. संबंधित आपत्ती विभागाचे अधिकारी जागेवर नाहीत. महापालिकेकडून क्षेत्रिय कार्यालयानुसार रात्रपाळीत कर्मचारी नेमण्यात आले असून, ते वेळोवेळी धरण क्षेत्र आणि पावसाची माहिती घेत आहेत. त्यानुसार ती माहिती आपत्ती विभाग आणि अग्निशमन दलाला कळवण्यात येते.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी किरण गावडे म्हणाले की, पावसामुळे पिंपरीतील संजय गांधी नगर वसाहतीत काही झोपड्यांना पाण्याने स्पर्श केला होता. त्याची दखल घेऊन तातडीने पाहणी केली. पाणी ओसरले असल्याने धोकादायक स्थिती सध्या तरी नाही. तरीही, पाणी लगत असलेल्या वसाहतीमध्ये अग्निशमन दलाची गस्त सुरु आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्यात येत आहे. त्याबाबत आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी अनिल कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शहरामध्ये रविवार अखेरपर्यंत सुमारे 32 मिमी पाऊस झाला होता. तर, एकूण 1 हजार 551 पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी पावसाचा जोर वाढला असून, सोमवार अखेरपर्यंत पावसाची 53 मिमी नोंद झाली आहे. सोमवार पावसाची ओढ वाढली असून, येत्या दोन दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्यावरण विभागाचे उपअभियंता मनोहर जावरानी म्हणाले की, शहरात पावसाची नोंद करण्याची स्वतंत्र यंत्रणा नाही. हवामान खात्याकडून बसवण्यात आलेले यंत्रणा ही केवळ हवामानाची स्थिती दाखवते.

स्वतंत्र पर्जन्यमापक नाही
पिंपरी-चिंचवड पावसाची नोंद होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पुणे, शिवाजीनगर येथील आकडेवारीवर अवलंबून राहावे लागते. मध्यंतरी सांगवी येथील एका शाळेमध्ये पावसाची नोंद घेण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, ती तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने पुन्हा पुण्यातील पावसावरून अंदाज काढावा लागतो. पुण्यातील हवामान खाते सांगवीतील पावसाचे नमुने घेऊन नोंद करते. मात्र, शहराचा पावसाची स्वतंत्र नोंद नसल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)