सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) – वागदरे ते गाळदेव या रस्त्याच्या सुमारे 3 किलोमीटर लांबीचा रस्ता ही वनविभागाच्या हद्दीत असल्याने मंजुरीसाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार अस्तित्वात असेल्या जुन्या रस्त्याचे काम सुरु करा. तसेच आपटी ते तापोळा जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे काम मार्गी लावा आणि सातारा शहरातील भु विकास बॅंक ते जुना आरटीओ चौक, जिल्हा परिषद चौकासह सातारा व जावली तालुक्‍यातील रहदारीच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापुर्वी बुजवा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज यांची भेट घेवून जावलीतील वागदरे- गाळदेव रस्ता, आपटी ते तापोळा नवीन पुल आणि सातारा व जावली तालुक्‍यातील महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे यासंदर्भात चर्चा केली. यावेळी उप अभियंता के.जी. निकम, सातारा व जावली तालुक्‍यातील सर्व अभियंते, संतोष आखाडे, भागोजी पाटील, दत्तात्रय आखाडे, भोगोली मुराचे सरपंच जयवंत आखाडे, तुकाराम आखाडे, शंकर जंगम, गाळदेवचे उपसरपंच राजाराम जंगम, झुमु हिरवे, बबन जंगम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आपटी आणि तापोळा जोडणारा पुल झाल्यास बामणोलीसाठी 24 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे तापोळा आणि बामणोली या भागातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी आपटी- तापोळा हा मोठा पुल होणे आवश्‍यक आहे. या पुलाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे पुलाच्या कामास तातडीने मंजुरी मिळवून हाही प्रश्‍न मार्गी लावावा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राजभोज यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)