आपच्या मंत्र्याविरोधात खटला चालवण्यास सीबीआयला हिरवा कंदिल

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे (आप) दिल्लीतील मंत्री सत्येंद्रकुमार जैन यांच्याविरोधात खटला चालवण्यास सीबीआयला केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आप आणि केंद्र सरकारांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्रालय सांभाळत असणाऱ्या जैन यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात सीबीआयने मागील वर्षीच गुन्हा दाखल केला आहे.

जैन यांनी फेब्रुवारी 2015 ते मे 2017 या कालावधीत 1 कोटी 62 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यांनी मागील पाच वर्षांत त्यांचे नियंत्रण असणाऱ्या कंपन्यांच्या नावे 200 बिघा शेतजमीन खरेदी केली. त्यांनी कोट्यवधी रूपयांच्या काळ्या पैशांचे गैरव्यवहार केले, असा सीबीआयचा आरोप आहे. आप आणि भाजपमधील संबंध आधीच ताणले गेले आहेत. जैन यांच्याविरोधातील कारवाईमुळे ते संबंध आणखीच बिघडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील अनधिकृत वसाहती नियमित करण्यासाठीची योजना जैन यांनी बनवली आहे. भाजपला त्याला विरोध आहे. त्यातूनच जैन यांना कारवाईचे लक्ष्य बनवले जात आहे. भाजप दिल्लीकरांचा शत्रू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीसाठी अपायकारक आहेत, अशा टीकेचे ट्‌विट केजरीवाल यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)