आनेवाडी-मेढा रस्त्याची चाळण

आनेवाडी ः आनेवाडीहून मेढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.

प्रतिनिधी मात्र चमकोगिरीत व्यस्त, दीड फुटांच्या खड्ड्यांचे साम्राज्य
भुईंज, दि. 1 (वार्ताहर)- महामार्गापासून पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय झाली आहे. मात्र, तरीही केवळ चमकोगिरीतच व्यस्त असणाऱ्या येथील प्रतिनिधींकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मात्र आजवर दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीचे मणके अक्षरश: खिळखिळे झाले आहेत तसेच गाड्यांचेही नुकसान होत आहे. दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघातही घडत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीदेखील संबंधित प्रतिनिधी आणि बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाऊस उचलण्यात तयार नसल्याचेच प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधूनही संताप व्यक्त होऊ लागला आहे.
आनेवाडी ते महिगावमार्गे मेढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून चाळण झाली आहे. रस्त्यात जागोजागी फुट ते दीड फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे पंचायतीचे सभापती पद मिरविणाऱ्या प्रतिनिधींच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खंत व्यक्त केली जात आहे.
सातारा- पुणे महामार्गालगत असणाऱ्या आनेवाडीतून रायगाव, खर्शी, सायगाव, प्रभुचीवाडी दुदुस्करवाडी, पवारवाडी, येरोनकरवाडी, मोरेवाडी, कदमवाडी, महिगाव, गोपाळपंताचीवाडी, आरडे, सोनगावहुन पुढे तसाच मेढा या तालुक्‍याच्या ठिकाणी हा रस्ता जातो. या रस्त्यावरुन दररोज वरील 14 गावातील विद्यार्थी आणि नागरिकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्याही फेऱ्या आहेत. पण एसटीचीही शाश्‍वत सेवा नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांनी प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. पण मेढा आणि वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात असलेला तब्बल 10 कि. मी. लांबीच्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्यात फुट ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. ते चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आधीच या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात जावून मोठ मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक पादचारी आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी 14 गावातील नागरिकांनी या विभागाचे लोकप्रतिनिधी आणि वाई मेढा येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासुन हजारो सह्यांचे वेळोवेळी निवेदने देऊन देखील हा रस्ता अद्यापपर्यंत दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे वरील 14 गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता 2019 च्या निवडणुकीत मते मगायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्याना हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधुन व्यक्त होताना दिसत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)