आनेवाडी टोलनाक्‍यावरील वजन काट्याचा भांडाफोड

तीव्र आंदोलन करुन वजन काटे उध्वस्त करण्याचा इशारा

सातारा- पुणे-सातारा महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावरील वजनकाट्याचा ट्रान्सपोर्ट संघटनेने भांडाफोड केला. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसमोर टोलनाक्‍यावरील वजन काटे चुकीचे मोजमाप करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून देऊन या दोन्ही टोलनाक्‍यावरील वजन काट्यांचा भांडाफोड केला.

आनेवाडी आणि खेड शिवापूर या दोन्ही टोलनाक्‍यावरील वजन काट्यामंध्ये अनेक दोष असल्याच्या आणि ते वजन काटे आहे त्या पेक्षा जास्त वजन दाखवत असल्याच्या असंख्य तक्रारी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांचेकडे आल्या होत्या.त्याची शहानिशा करण्यासाठी प्रकाश गवळी आणि शेकडो वाहनधारक शनिवारी सकाळी 11 वाजता आनेवाडी टोलनाक्‍यावर दाखल झाले.भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस,संपर्क प्रमुख अनुपम खरे,आनेवाडी तोल प्लाझाचे रिलायन्सचे व्यवस्थापक विवेक शर्मा,ठेकेदार माणिक पवार, टेम्पो संघटनेचे अविनाश कदम,निलेश शिंदे,शिंद्धान्त फाळके,स्वप्नील मांढरे,काळी पिवळी टॅक्‍सी संघटनेचे अध्यक्ष विकास चोरगे,जवाहर शिंदे,बाबा शेख, बाबू जाधव, वैभव येवले,मयूर नलावडे,मच्छिद्रनाथ तपासे,बसवराज जमादार उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांसमोर आनेवाडी आनेवाडी टोल नाक्‍याच्या दोन्ही बाजूच्या वजन काट्यावर एकाच वाहनाचे वजन केले असता दोन्ही वजन काट्यावरील एकाच वाहनाचे वजन वेगवेगळे येत असल्याचे दाखवून दिले.त्याच बरोबर एका माल ट्रक चे वजन आनेवाडी टोलनाक्‍यावर 35130 किलो आल्यावर त्याच माल ट्रक चे वजन खेड शिवापूरच्या वजन काट्यावर मात्र 38430 किलो येत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. या दोन्ही टोल नाक्‍यावरील वजन काट्यांचा भांडाफोड केल्यावर प्रकाश गवळी आणि सर्व वाहन धारकांनी वाहन धारकांची लूटमार करणाऱ्या या टोल नाका व्यवस्थापनाचा निषेध आणि धिक्कार करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना प्रकाश गवळी म्हणाले की, परिवहन विभागाने सर्वच वाहनांची माल वाहून नेण्याची क्षमता पाच टक्‍क्‍यांनी वाढवली असून देखील या दोन्ही टोलनाक्‍यावर जुन्या नियमानेच वाहनाचे वजन करुन त्या वाहनांचे वजन जास्त नसून देखील प्रत्येक वाहन धारकांकडून चुकीचा दंड आकारून अक्षरशः लूटमार चालवली आहे.अश्‍या चुकीच्या प्रकारातून आतापर्यंत करोडो रुपयांची लूटमार करण्यात आली असून प्रत्यक्ष वजनापेक्षा जास्त वजन दाखवणाऱ्या या दोन्ही टोलनाक्‍यावरील हे वजन काटे तात्काळ बंद केले नाहीत तर तीव्र आंदोलन करुन हे वजन काटे उध्वस्त करण्याचा इशारा त्यांनी दिला.

अहवाल वरिष्ठांना पाठविणार
दोन्ही वजन काट्यावरील जास्त वजन दाखवण्याचा हा घोळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दाखवून दिल्यानंतर आता तुम्ही काय करणार असा प्रश्न विचारला असता हे याबाबतचा अहवाल त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचे अनुपम खरे यांनी सांगितले परंतु तोपर्यंत हेच वजन काटे सुरू राहतील मग वाहन धारकांची लूट थांबणार कशी यावर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)