आनंद ऋषिजी हॉस्पिटल सर्वसामान्यांचा आधार

नगर – “”आज वैद्यकीय सेवा महाग होत आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण उपचार घेण्याचे टाळतो. परंतु, या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलमध्ये येत आहे. आनंदऋषिजी हॉस्पिटलची सेवा ही अल्पदरात सर्वसामान्याला परवडणारी असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिबिरामध्ये रुग्णसेवा हेच उद्दिष्ट असल्याने सर्वसामान्यांचा हॉस्पिटलविषयी विश्‍वास वाढत आहे. “मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद समोर ठेवून आनंदऋषिजी हॉस्पिटलच करत असलेले काम निश्‍चितच भूषणावह आहे,” असे प्रतिपादन शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

राष्ट्रसंत श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त आनंदऋषिजी हॉस्पिटल आयोजित व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अस्थिरोग, मणके, सांधेबदली तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आला. या शिबिरासाठी पूज्य आनंद, पूज्य अचलगुरू फाउंडेशन, पुणे यांचे योगदान लाभले. शिबिरास स्टेट बॅंकचे रिजनल मॅनेजर दिनकर वारांग, सोमाणी, अशोक कानडे, सुभाष गुंदेचा, संजय घुले, संजय गुगळे, सतीश लोढा, अभय गुगळे, दिलीप गुगळे, डॉ. आशिष भंडारी, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. अखिल धानोरकर, डॉ. आशिष रानडे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना फिरोदिया म्हणाले, “”शिबिर हे गोरगरिबांकरिता वरदान ठरत आहे. गरीब रुग्णांकरिता याचा निश्‍चित फायदा होत आहे. अत्यल्प दरात चांगली सेवा देण्याचे काम आनंदऋषिजी हॉस्पिटल करत आहे. अशा प्रकारची मोफत शिबिरे घेणे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून आनंदऋषिजी हॉस्पिटलचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. यावेळी स्टेट बॅंकेचे दिनकर वारांग, शहर बॅंकेचे चेअरमन अशोक कानडे, सुभाष गुंदेचा, बीएसएसएलचे अजातशत्रू सोमाणी, आदींनी आपल्या भाषणातून हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा समाजातील गरजूंना होत असलेला लाभ समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले व हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केले. शेवटी आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबिरात डॉ. प्रशांत पटारे व अखिल धानोरकर यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात 154 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गुरुवार, दि. 17 ऑगस्ट रोजी हार्निया हायड्रोसिल व जनरल तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराने सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)