आनंदी जीवनासाठी स्वभावात विनम्रता आणावी – राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज

आनंदी जीवनासाठी स्वभावात विनम्रता आणावी – राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज

चिंचवड – मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की, मनुष्याला चटकन राग येतो. बाहेर खूप चांगला वागणारा मनुष्य घरामध्ये लहानसहान गोष्टींवरून कुटुंबातील सदस्यांवर रागावत असतो. कोणत्याही प्रकारचा राग हा क्षणभंगुर असतो, त्याचे परिणाम मात्र दीर्घकाल राहतात. दुसऱ्याकडून चूक झाल्यास शिक्षा देणारा कधीच मोठा होत नाही, तर चुकीला माफ करणारा मोठा होत असतो. जैन धर्मातील पर्युषण पर्व हे क्षमाशीलतेचे प्रतीक आहे. ते मनुष्याच्या अंत:करणातील प्रदूषण दूर करते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोरया मंगल कार्यालय प्रांगणात सुरू असलेल्या दिव्य सत्संग सोहळ्यात “कैसे पाएँ क्रोध से छुटकारा’ या विषयावर मार्मिक उदाहरणे देत प्रबोधन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. शांतीप्रियजी महाराज उपस्थित होते. यावेळी मनीष सोनिगरा, किशोर टांटिया, सुरेश गदिया, संतोष धोका, सुरेश चौरड़िया, सचिन धोका, तुषार लुणावत आदी उपस्थित होते. प्रवचनानिमित्त आलेल्या भाविकांना राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज यांच्या विचारांचे पुस्तक देण्यात आले. पुस्तक प्रभावनेसाठी सुरेश जैन, राजेष जैन, संजय जैन यांचा संयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला.

प्रवचन देताना राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज पुढे म्हणाले की, आजपर्यंत जगात रागामुळे कधीच कोणाचा लाभ झालेला नाही, रागामुळेच हानी मोठ्या प्रमाणात होत असते. काचेचा हिरा व अस्सल हिरा यांच्यातील फरक डोळ्यांना लवकर कळून येत नाही. परंतु, उन्हात ठेवल्यावर काचेचा हिरा गरम होतो तर अस्सल हिरा शांत, नरमच राहतो. आपल्या रागाचेही तसेच असते. थोडी विपरीत परिस्थिती आली तरी आपण लगेच गरम होतो. प्रत्येकाने हिऱ्यासारखे बनण्यासाठी परिस्थिती कोणतीही असली तरी आपल्यातील शांतपणा जपला पाहिजे. समाजात तुम्हाला कितीही मानसन्मान मिळाला तरी जोपर्यंत तुमच्या कुटुंबातील मंडळी तुम्हाला शांत, सुस्वभावी असल्याचे म्हणत नाही, तोपर्यंत तुमच्या बाहेरील मानसन्माला अर्थ नाही. राग हा ब्रम्हास्त्रासारखा असतो, ते योग्य वेळीच वापरायचे असते.

आई-वडीलांवर रागावणाऱ्यांचे भाग्य कधीच त्याला साथ देत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. स्वत:ला ओळखा, आपण राग, आपण मनात ठेवलेली कटुता याचा गांभीर्याने विचार करा, तुम्हालाच स्वत:च्या चुका कळून येतील. आयुष्यात कायम सुखी राहण्याची इच्छा असेल तर स्वभावात विनम्रता आणावी. राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी उपस्थितांना अनेक उदाहरणे देत, लहान लहान बोधकथांतून रागावर नियंत्रण ठेवण्याचे सोपे मंत्र समजावून सांगितले.

दिव्य सत्संग सोहळ्यास आबालवृध्द भाविक मोठी गर्दी करीत आहेत. भाविकांच्या या भक्‍तीभावाचे राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी विशेष कौतुक केले. देशभरात फिरत असताना चिंचवडमध्ये मिळणारे प्रेम, येथील भाविकांचा उदंड प्रतिसाद व चांगल्या कार्यात झोकून देण्याचा स्वभाव खूपच आनंददायी आहे. या सोहळ्याचे अतिशय उत्तम नियोजन करून लाभार्थी परिवारांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास हातभार लावला आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)