आनंददायी फराळ

दिवाळी म्हटली की गोड, तिखट खाद्य पदार्थ, नवीन कपडे, रंगकाम, रांगोळी आदी गोष्टी ओघाने येतातच. ‘प्रकाशा’च्या या सणाची, अशी एक विशेष ओळखच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या कालावधीत घराबाहेर नजर टाकल्यावर दिसणारे रंगीबेरंगी कंदील, विजेची तोरणे मन प्रसन्न करतात. काही हौशी मंडळी रात्रीच्या वेळेस पतंगाच्या मागे आकाशकंदील लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या सणाचा प्रत्येकजण आपल्यापरीने मनमुराद आनंद घेत असतो. दिवाळीचे 4-5 दिवस पटपट निघून जात असले, तरी पुढील काही कालावधीसाठी सकारात्मक ऊर्जाच प्रकाशाच्या सणाच्या माध्यमातून मिळते.

वर्षभर विविध सण-उत्सव साजरे केले जातात. मात्र ‘दिवाळी’ या सणाचा ‘बाज’च वेगळा आहे. कारण या सणाच्या वेळी अन्य सणांपेक्षा गृहिणींना स्वयंपाक घरामध्ये अधिक काळ द्यावा लागतो. नेहमीच्या जेवणाचा भाग पूर्ण करून ‘फराळ’ बनवण्यासाठी आवर्जून वेळ देणे, हे पाककलेची आवड आणि त्यावर प्रेम असल्याविना शक्‍यच नाही. ‘आवड असेल, तरच सवड मिळेल’ हे वाक्‍य गृहिणी त्यांच्या नेहमीच्या धावपळीतून कसे सत्य ठरवतात, हे विचारकरण्याजोगे आहे. मुलांची शाळा, पतीसाठी टिफिन, गृहस्वच्छता, बाजारहाट, प्रत्येकाच्या खाण्यातील आवडीनिवडी, कुटुंबीयांचे रागरंग सांभाळणे, आदी करत कुटुंबाचे आर्थिक बजेट जुळवत गृहिणी दिवाळीसाठी करत असलेला ‘फराळ’ किती महत्त्वाचा असतो, हे लक्षात येते. काही पुरुष मंडळीही फराळ बनवण्यासाठी गृहिणींना साहाय्य करतात, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे, असे म्हणता येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक महिना आधीपासूनच विविध कंपन्या फराळ बनवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या त्यांच्या उत्‌पादनांची विज्ञापणे विशेषता वाहिन्यांवरून सतत प्रसारित करत असतात. त्यामुळे टीव्ही पाहाताना दर्शकांना महिनाभरानंतर येणाऱ्या या सणाच्या वेळी कोणता फराळ बनवायचा याचा विचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि फराळ बनवायचा आहे, याचे टीव्हीवरील विज्ञापन पाहिल्यावर भान रहाते. फराळाच्या विज्ञापनाच्या निमित्ताने एक महिना आधीपासूनच दिवाळी चालू झालेली असते, असे म्हणता येईल. फराळ बनवण्यासाठी गृहिणींना प्रोत्साहन देण्याचे मोठे कार्य विज्ञापने पार पाडतात.

आजच्या धावपळीच्या युगात फराळ बनवण्यासाठी नोकरदार स्त्री वर्गाला वेळ नाही, हे वास्तव आहे. यातूनही काही नोकरदार स्त्रिया आठवड्याच्या सुट्टीच्या कालावधीत काही निवडक पदार्थ बनवत असतात. त्यामुळे घरच्यांसह कार्यालयातील मंडळींनाही घरी बनवलेल्या पदार्थाची चव चाखण्यास मिळते. महत्त्वाचे म्हणजे आपली आई, ताई, मावशी आदी नोकरीत व्यस्त असूनही आपल्यासाठी फराळ बनवतात, हे घरातील सर्वांसाठी (बाबा, भाऊ, मुलगा-मुलगी) लक्षवेधी ठरते.

प्रत्येक अनुभव मग तो नोकरी-व्यवसायातील असो वा शिक्षणातील असो वा स्वयंपाकगृहातील तो आपल्या ज्ञानात आणि नवीन काहीतरी शिकण्यास मिळाले याच्या समाधानात भर पाडणारा असतो. स्त्री-पुरुष कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांना स्वयंपाक यायलाच पाहिजे. त्यातूनच आपल्या सणांच्या वेळी गोड काय बनवायचे याचेही प्रयोग करता येतात. हेच प्रयोग विविध पदार्थ बनवण्याची प्रेरणा देतात. ‘एखाद्याचे मन जिंकायचे असेल, तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून शोधावा’. कारण जेव्हा कोणाला आपण एखादा पदार्थ खाण्यास देतो, तेव्हा त्याची चव त्याच्या जिभेवर कायम रेंगाळत रहाते आणि पुन:पुन्हा त्या पदार्थाची वर्षभर आठवण निघत रहाते. दिवाळीच्या फराळाच्या माध्यमातून ही गोष्ट अनुभवता येईल.

20-25 वर्षांपूर्वीप्रमाणे एकमेकांच्या घरी फराळ बनवण्यास जाणे होत नाही. मात्र, फराळाची देवाणघेवाण करण्याचा भाग काहीप्रमाणात तरी टिकून आहे. यामुळे एकाच पदार्थाच्या विविध चवी चाखता येतात. असे असले तरी आपल्याकडील गोष्ट दुसऱ्याला देण्याचा भाग चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. कित्येक मंडळी दिवाळी फराळ वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांमध्ये जाऊन वाटत असतात. एक फराळ आपल्याला देशाची सीमा- शेजारी, नातेवाईक ते ज्यांना मायेच्या ओलाव्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो, हे ठळकपणे अधोरेखित होते. व्यापक विचार केला, तर फराळ ही गोष्ट आपल्याला कुठपर्यंत पोहोचवू शकते, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करणे आवश्‍यक आहे. सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोनचा अतिरेकी उपयोग चालू असल्याने एका घरात रहाणारी माणसेही एकमेकांपासून दुरावली आहेत. ‘पुढचं पाठ मागचं सपाट’ अशी बिकट स्थिती आहे. स्वतःच्या कोषातून बाहेर येऊन सामाजिक बांधीलकी टिकवण्याची प्रेरणा देणाऱ्या सणांतील गोडवा टिकून रहाण्यासाठी फराळाच्या डिश सोशल मीडियावरून केवळ शेअर आणि फॉर्वर्ड न करता त्या करण्यासाठी घरच्यांना साहाय्य करणे ही काळाची नितांत गरज आहे.

दिवाळी हे सैनिकांशी जोडले जाण्याच्या दृष्टीने उत्तम निमित्त आहे. कुटुंबीयांसह सण-उत्सव साजरा करण्याची संधी फार कमी वेळा सैनिकांना मिळत असते. कुटुंबापासून लांब असताना सणाच्या वेळेला प्रत्येक सैनिकाला आपल्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांची आठवण येत नसेल, असे अशक्‍यच! वाघा बॉर्डरवर दिवाळीच्या वेळी पाकिस्तानी सैनिकांना (सैनिक कुठले सैन्याच्या वेषातील सैतान) औपचारिकता म्हणून मिठाई देण्यात आली आहे. मात्र, त्यांची पात्रता नसूनही दिवाळी भेट मिळत गेल्याने भलतेच शेफारले गेले. यांच्यावर गोळ्या, बॉम्ब आदी युद्धसामग्रींनी ‘तुफान आक्रमण’ करून कायमचे नामशेष करत समस्त भारतवासियांना ‘आगळीवेगळी भेट’ देण्यास सैनिक आतुर आहेत. तेव्हा साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा आनंद आणि फराळाचा गोडवा निश्‍चितच अवीट असेल.

फराळाची विशेषता म्हणजे ‘दिवाळी’च्या कालावधीत सर्वत्र गोड-गोड अधिक खावे लागत असले, तरी दिवाळी संपल्यावर काही कालावधीनंतर आपोआप पावले ते पदार्थ शोधण्यासाठी स्वयंपाकगृहाकडे वळतातच. दिवाळी हा सण संपल्यावरही त्याचा गोडवा कसा आणि किती दीर्घकाळ टिकून रहातो, याचा अनुभव घराघरातील मंडळी प्रतिवर्षी घेत असतात. तोच गोडवा सामाजिक नात्यांतही टिकवून ठेवला पाहिजे. ‘मीही या समाजाचे, देशाचे ऋण देणे लागतो’. याची खुणगाठ मनी बांधत समाज आणि राष्ट्रासाठी उपलब्ध वेळेत सेवारत रहाण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.

– जयेश राणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)