आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा, आरोग्याबद्दल काळजी घेतली जाते

नगर – “”आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्याबाबत घेत असलेली शिबिरे गरीबांकरिता सर्वोत्तम आहेत. अतिशय अल्प दरात उच्च दर्जा असलेली सेवा येथे दिली जाते. त्यामुळे रुग्णांचे व हॉस्पिटलचे जवळचे नाते निर्माण झाले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्याबद्दलचे शिवधनुष्य पेलले आहे हे निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्निल देशमुख यांनी केले.

श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या 26 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित व स्व. सुवालाल गुगळे व स्व. कमलबाई सुवालाल गुगळे यांच्या स्मरणार्थ गुगळे परिवार प्रायोजित मेंदू, मणके व मज्जारज्जू संबंधित आजार तपासणी शिबिराचे उद्‌घाटन स्वप्निल देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभय गुगळे, अजित गुगळे, श्रुती गुगळे-गांधी, साधना गुगळे, कल्पना गुगळे, सारिका गुगळे, मोहनलाल गांधी (कर्जतकर), सीए सोहन गुगळे, रोनक गुगळे, कायदेशीर सल्लागार ऍड. धनंजय सप्तर्षी, दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी राम पावडे, राजेंद्र मुथा, शिबिरातील तज्ज्ञ डॉ. प्रवीण जैन, डॉ. तनय सोलापूरकर, डॉ. शैलेंद्र मरकड, प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी, डॉ. मनोहर पाटील, सतीश लोढा, अजित पारख, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना स्वप्निल देशमुख म्हणाले, “”सामाजिक काम करताना नेहमी पदाची अपेक्षा केली जाते. परंतु, याला छेद देत आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पदाधिकारी, डॉक्‍टर्स, कर्मचारी एका सामाजिक भावनेतून काम करत आहेत हा समाजाकरिता एक आदर्श आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा व आरोग्याबद्दल काळजी घेतली जाते. त्यामुळे गरीब रुग्णांचा या हॉस्पिटलवर विश्‍वास वाढला आहे. सामान्य रुग्णाला आजाराबाबत मोठा खर्च करणे शक्‍य नसते. त्यामुळे तो उपचार घेण्याचे टाळतो. परंतु, या शिबिरातून अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. त्यामुळे ही शिबिरे रुग्णांकरिता वरदान ठरत आहेत.”
याप्रसंगी प्रायोजिका श्रृती गुगळे-गांधी म्हणाल्या, “”जैन सोशल फेडरेशन सातत्याने ही मोफत तपासणी शिबिरे घेत आहे. यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटल व रुग्ण यांची एक नाळ जुळली आहे. मानवतेचे मंदिर असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल गरीबांची सेवा करण्याचे पुण्य कार्य आमच्या हातून करून घेत आहे. या माध्यमातून नकळत एक सेवा घडत आहे.”
याप्रसंगी राम पावडे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून आनंदऋषीजी हॉस्पिटल एक पवित्र काम करत आहे. असे सांगून त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव केला.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, हॉस्पिटलच्या सेवाकार्यात गुगळे परिवारासारखे अनेक दानशूर व सेवाभावी संस्थेकडून नेहमीच मदत होते. त्यामुळे आम्हाला काम करण्यास प्रेरणा मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)