आधुनिक व पारंपरिक…पंजाबी ड्रेस!

पाच-सात वर्षांपूर्वीचा कोणताही सण-समारंभ किंवा लग्नकार्य आठवून पाहा. त्याबरोबर तेव्हाचे पोषाखही आठवून पाहा. अशा कार्यक्रमांमध्ये वापरण्यासाठी आवर्जून खरेदी होत असे साड्यांचीच. शालू हा प्रकार तेव्हाही मागे पडलेला होता, पण साड्यांमध्ये मात्र नानाविध प्रकारांची रेलचेल असायची. बांधणी, छोटे काठ, मोठे काठ, मलई सिल्क, खादी सिल्क, कोटा, कलकत्ता, राजमाता, जिजामाता आणि निदान एक तरी पैठणी स्वत:च्या संग्रही असणं- ही कोणाही स्त्रीची इच्छा असणं स्वाभाविक होतं.

पण आज मात्र चित्र पालटलंय. दैनंदिन जीवनात जसा बहुतेक महिलांचा पोशाख साडीवरून सलवार कमीजवर आलेला दिसतो. तसाच तो सणासुदीलाही दिसू लागला आहे. पोशाखात असा दुहेरी बदल जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा तेव्हा सामान्यत: दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. एक म्हणजे पार्टी वेअरसाठीच्या आधुनिक पोशाखांमध्ये पारंपरिक पद्धतीची डिझाईन्स वापरतानाच कशिदाकाम वापरून त्यांना “एथनिक’ बनवायचा प्रयत्न केलेला असतो किंवा पारंपरिक पद्धतीच्या पोषाखांमध्ये रंग डिझाईन्स याबाबतीत आधुनिक काळाला साजेसे बदल केलेले असतात. पारंपरिक “चनिया चोळी’ किंवा राजस्थानी घागरा ओढणीचं आधुनिक “शरारा’त झालेलं रूपांतर हे या प्रकारात मोडणारं आहे. सलवार कमीजच्या बाबतीत मात्र ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र आलेली आहेत. दैनंदिन व्यवहारात सर्रास वापरला जाणारा हा पोशाख सणासुदीलाही वापरात येऊ लागला. याचं कारण काय असावं? उत्तर या पोशाखात उपलब्ध असणाऱ्या विविधतेमध्ये सापडतं. ए-लाईन, लखनवी, ए-लाईन विथ साईड कटस, अंब्रेला असे कमीजचे प्रकार. स्लिवलेस, मॅगा स्लिव्हज, चुन्नी पॅरेलल्स चुडीदार, साधी सलवार असे सलवारचे प्रकार.

यात पुन्हा त्या त्या प्रकारांत स्वत:च्या आवडीनुसार डिझाईनच्या, रंगाच्या निवडीला भरपूर वाव असतो. रोजच्या निवडीला भरपूर वाव असतो.

रोजच्या वावरासाठी महिलांमध्ये कॉटनमध्ये उपलब्ध असणारे प्रिंटस्‌ मनोवेधक असतात. कॉटन, खादी, बांधणी याचा मोठा फायदा असा की, उत्तम निवड करून प्रत्येकी तीन सूटचे सेट जरी असले तरी ते एकमेकांना पुरक ठरू शकतं. असे “कॉम्बिनेशन’ डोक्‍यात ठेवूनच रंगाची निवड केल्यास वापरण्यासाठी बरेच ड्रेस आहेत असं जाणवेल.

“स्वस्त आणि मस्त’ असल्यामुळे प्रचंड मागणी असणारा नवा प्रकार म्हणजे “प्रिंटेड मलई सिल्क’ दीडशे रुपयांपासून ही “ड्रेस मटेरियल्स’ उपलब्ध आहेत. या प्रकारात दुपट्टा, सलवार, कमीज तीनही एकाच प्रिटमध्ये असतात. ऑफिसमध्ये “ताबडण्यासाठी’ म्हणून हा प्रकार सर्वोत्तम, हलका आणि मळखाऊ.

सण-समारंभ आणि कार्यासाठी मात्र हाच पोशाख वेगळंच रूप घेऊन आलेला दिसतो. समारंभातही “बांधणी’ महिलाप्रिय आहे. फरक इतकाच, की समारंभासाठी हे प्रिंट सिल्कवर केलेलं असतं. मोत्याचे सुंदर काम असणारे “योक’चे ड्रेसेस, संपूर्ण ड्रेसवर नाजूक भरतकाम, ड्रेस प्लेन परंतु दुपट्यावर कशिदाकाम असे प्रकार “फंक्‍शन वेअर’ मध्ये दिसतात. भरतकामातही पारंपरिक डिझाईन्सच्या वापरामुळेच पोषाखाला उत्सवी स्वरूप येते. काठापदराच्या साडीसारखे दिसणारे पंजाबी सूट पिसेस सध्या प्रिय आहेत.

या सर्व निरिक्षणांवरून एक निष्कर्ष हमखास काढता येतो. “सलवार-कमीज’ हे पोषाखाचं स्वरूप असलं, तरी सुरुवातीला सांगितलेल्या साड्याच्या प्रकारातूनच हे आधुनिक पोशाख जन्माला आले आहेत.

– सुजाता गानू 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)