आधुनिक तीर्थक्षेत्र

संग्रहित छायाचित्र

 

अधिकस्थ अधिकम्‌ फलम! सध्या अधिक मासामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. बरेचजण विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करून पुण्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. देवदर्शन या महिन्यात जास्त प्रमाणावर करण्याचा प्रघात दिसतो. शेतकरी बंधूंना खास सुवर्णसंधी म्हणता येईल, असा आधुनिक तीर्थक्षेत्र भेटीचा योग नजीकच्या कोणत्याही कृषी विद्यापीठ दौऱ्यातून प्राप्त होऊ शकतो.

डॉ. सौ. ममता समीर पटवर्धन
सहायक प्राध्यापक (विद्युत अभियांत्रिकी)
प्रक्षेत्र संरचना व ग्रामीण विद्युतीकरण विभाग
डॉ. अ. शिंदे. कृषी अभि. व तंत्रज्ञान महाविद्यालय,
म.फु.कृ.वि., राहुरी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील 70 टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न व्यवसायावर अवलंबून आहे, ही माहिती आपणा सर्वांनाच बालवयापासून आहे. आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात देखील कृषी क्षेत्राचा खूप महत्तवाचा वाटा आहे. औद्योगिक क्रांतीपाठोपाठ कृषी क्रांतीला खूप मोठे महत्त्व आहे. महात्मा गांधीजींनी खूप पूर्वीच “खेड्यांकडे चला’ हा संदेश देऊनही आजकाल सर्व तरुण पिढीला शहरे आकर्षित करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरांची अफाट गतीने लोकसंख्या वाढ होत आहे व अनुषंगिक समस्या मोठ्या झाल्या आहेत. यावर एकच उपाय म्हणजे शेती व्यवसायाचे सबलीकरण. हे काम ज्या संस्थांमार्फत चालवले जाते, त्यापैकी एक म्हणजे कृषी विद्यापीठे.

जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण चार विद्यापीठे सरकारने स्थापन केलेली आहेत, की जी फक्‍त कृषी विषयक मौलिक कामगिरी करतात. या विद्यापीठांचे काम मुख्यत्वे: शिक्षण, संशोधन व विस्तार या त्रिसूत्रीवर चालते. सर्वसाधारण विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठामार्फत कृषी विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर तसेच आचार्य या पदव्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. बारावीनंतर शेती, अन्न तंत्रज्ञान, बायोतंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी हे पदवी अभ्यासक्रम तसेच कृषीमधील 15 विषयांत व अभियांत्रिकीमधील 5 विषयांत पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या विद्यार्थ्यांची कृषी विषयातील रुची वाढत असल्याचे प्रवेशासाठी आवश्‍यक प्रक्रियेचा अभ्यास करता दिसून येते. प्रत्यक्ष जागेपेक्षा पाच पटीने जास्त अर्ज दरवर्षी प्राप्त होतात. सध्या ही प्रक्रिया पूर्णत: संगणकीय प्रणालीवर गुणवत्तेवर आधारित तसेच पारदर्शक पद्धतीनेच राबवली जाते. या वर्षांपासून कृषी अभ्यासक्रमास व्यावसायिकतेचा दर्जा देण्यात आल्याने सन 2018-19 चे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा घेऊनच होणार आहेत. या सर्वच अभ्यासक्रमांत विद्यार्थी प्रत्यक्ष शेती विषयक प्रात्यक्षिके करून अनुभव घेतात. कृषीमधील सर्वच बाबींचा जसे दुग्धपालन, शेळीपालन, कुक्कटपालन, विविध प्रक्रिया उद्योग अशा शेतीपूरक गोष्टींचा देखील विद्यार्थी सखोल अभ्यास करतात. शेती विषयक येणा-या विविध अडचणींवर कशी मात करता येईल याचे मार्गदर्शन घेतात.

कृषी विद्यापीठातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे संशोधन. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या खाद्यविषयक गरजा पुरविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, वाण, पीक पद्धती, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर येथील शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. शेतक-यांच्या गरजा जाणून घेऊन तापमानवाढीचा नजीकच्या भविष्यकाळातील धोका ओळखून उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून हे संशोधन चालते. या कृषी विद्यापीठांमध्ये प्रत्येक मुख्य पिकांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्रे उपलब्ध असून, त्या पिकातील जाणकार तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली लहान-मोठे, खूप मोठे साखळीयुक्‍त प्रकल्प राबविले जातात. यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. वेगळ्या अतिरिक्‍त प्रमाणात पैशांचे पाठबळ मिळते. सदर ठिकाणी होणारे संशोधन विद्यापीठस्तरावर तसेच राज्यस्तरावर दरवर्षी बैठकीत मांडले जाते. त्यावर सांगोपांगी सखोल चर्चा होऊन ठराव संमत होतात अथवा सुधारणा सूचवली जाते. मान्य झालेल्या ठरावांना शिफारशी म्हणतात. त्या कृषी विभागामार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. दरवर्षी लाखो शेतकरी सर्व विद्यापीठांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथे चालू असलेले संशोधन पाहू शकतात. विद्यापीठांमध्ये हंगामनिहाय कृषी पीक प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्यामध्ये तर एकाच पिकाचे वाण प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर पाहण्याची सुवर्णसंधी सर्वांना मिळते.

आता तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विस्तारकार्य. सर्व विद्यापीठांनी अथक परिश्रमाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम विस्तार शिक्षण संचालनालय करीत असते. तंत्रज्ञान प्रसारणासाठी या संचालनालयामार्फत विविध प्रकारची प्रकाशने जसे कृषी दर्शनी, श्रीसुगी, दैनंदिनी, मार्गदर्शिका इ. प्रकाशित करण्यात येतात. त्यासोबतच आकाशवाणी लघु व मध्यम लहरींवर कृषी विषयक कार्यक्रम प्रसारित करते. तसेच दूरदर्शन, खासगी व सरकारी वाहिन्यांवर देखील प्रत्यक्ष “आँखोदेखा हाल’ दृश्‍यफितीच्या रूपाने जिवंत स्वरूपात घरबसल्या शेतकरी पाहू शकतो. विविध मासिके, पाक्षिके, दैनंदिन वृत्तपत्रे यामध्ये देखील कृषी विषयक पुरवण्या प्रकाशित करताना कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे योगदान खूप मोलाचे ठरते. कृषी विद्यापीठांमध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचदेखील आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या मदतीशिवायच शेतकरी आपल्या अडचणी विद्यापीठ अधिकाऱ्यांजवळ मांडू शकतात व त्यांचे शंका निरसन करून घेतात. पिकांच्या विविध जाती खासकरून अधिक उत्पादन, फायदेशीर शेती या गोष्टी मूळ धरून विकसित केल्या जातात. शेतकऱ्यांना त्याच्या पिकांची गुणवत्ता वाढवणे, पिके निर्यात करणे, कमी पाण्यावर शेती फुलवणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन फक्‍त कृषी विद्यापीठांत मिळू शकते. एकूणच शेतकऱ्यांना केंद्रीभूत मानून त्यांच्या कल्याणासाठीच विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकरी गट संघटन व शेतकरी उत्पादक समूह यांच्या निर्मितीद्वारे शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान व शेती व्यवस्थापन विषयक प्रश्‍नांची सोडवणूक करताना टोल फ्री नंबरच्या साहाय्याने माहिती-तंत्रज्ञान केंद्राद्वारे विद्यापीठे आता शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पोहचलेली आहेत. त्यामुळे शेतकरी-शास्त्रज्ञ हे जास्त जवळ येऊन दोघांचीही उन्नती होत आहे.

ग्रामीण व नागरी जीवनातील तफावत कमी करून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कार्यरत असणारी ही विद्यापीठे म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आधुनिक तीर्थक्षेत्रेच ठरावीत. चला तर मग आधुनिक तीर्थक्षेत्र भेटीला…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)