आधी पाडले, आता होणार गुन्हे दाखल

पुणे – महापालिकेकडून सुमारे 150 अनधिकृत होर्डिंग्ज गेल्या दीड महिन्यांत काढली आहेत. या सर्व होर्डिंग्ज मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी दिली. पालिकेने केलेल्या फेर सर्वेक्षणात सुमारे 227 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आली आहेत.

मंगळवार पेठेत होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर महापालिकेने तातडीने अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा निर्णय घेतला. या दुर्घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, शहरात 1,886 अधिकृत तर 121 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक होर्डिंग्ज असल्याचे आरोप लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांनी केले होते. त्यानंतर पालिकेने पुन्हा होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण केले. त्यात अनधिकृत होर्डिंग्जचा आकडा 227 दिसून आला. त्यानंतर गेल्या दीड महिन्यांत पालिकेने सुमारे 150 होर्डिंग्ज जमीनदोस्त केले आहेत.

सर्वांवरच फौजदारी गुन्हे
महापालिकेने हे 150 होर्डिंग्ज काढताना त्याचे मालक तसेच जागामालक निश्‍चित केले आहेत. तसेच कारवाईवेळी फोटो तसेच चित्रिकरणही केलेले आहे. त्या महितीच्या आधारे या 150 मालकावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यास एक ते दोन दिवस जातात. त्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन आधी कारवाई सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)