‘आधीच्या काढलेल्या निविदांचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा’

प्रभात वृत्तसेवा
पुणे- जीएसटी लागू झाल्यानंतर त्या करप्रणालीनुसार निविदा काढून त्याची जाहिरात देण्याऐवजी जुन्याच रचनेप्रमाणे निविदांची जाहिरात देऊन महापालिकेचे लाखो रुपये खर्च करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून खर्च वसूल करावा असा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवला आहे. योगेश ससाणे यांनी याबाबत स्थायीला पत्र दिले आहे.

एक जुलै पासून जीएसटी लागू झाली आहे. या जीएसटीनुसारच दर निश्‍चिती करून निविदा काढणे आवश्‍यक होते. जीएसटी लागू होण्याआधीच्या काढलेल्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाइनच्या कामाचाही समावेश आहे.

असे असताना जीएसटी लागू झाल्यावरही जुन्याच दर रचनेप्रमाणे निविदा काढून त्याच्या जाहिराती दिल्या गेल्या आहेत. आणि आता त्या निविदा प्रक्रिया रद्द करून जीएसटीप्रमाणे नव्याने रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहित असतानाही जुन्या रचनेप्रमाणे जाहिराती ज्या अधिकाऱ्यांनी दिल्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि जाहिरातींसाठी झालेला खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.
हा प्रस्ताव स्थायी समितीने प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)