आदेश साहेबांचा …

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सातारा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार कोण असणार याची लोकशाही मार्गाने मुंबई पासून सातऱ्यापर्यंत चर्चा झाली. या चर्चेचा निषकर्ष सध्याचे खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी कडूनच निवडणूक लढतील असा झाल्याचे आज स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकमेव पैलवान खासदारच असल्याने इतरांनी कितीही किस्ताक कसला तरी फारसा उपयोग होणार नाही. प्रत्येकजण ,””साहेब सांगतील तो निर्णय मान्य” या मुळ पदावर येऊन थांबत असल्याने इलाज,नाईलाजाने उदयनराजेंना मदत करावीच लागणार आहे.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये ही उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत बरीच चर्चा झाली होती. विरोधी आणि बाजूच्या मतांची घुसळण झाली मात्र अखेरीस उदयनराजे दोन्ही वेळा निवडून आले ते ही चढत्या मताधिक्‍याने !

गेल्या निवडणुकीतही उदयनराजेंच्या विरोधात वातावरण होते. मदत करायची नाही, तळ्यात मळ्यात रहायचे, बरोबर थांबून विरोधात प्रचार करायचा असे अनेक फंडे वापरले गेले मात्र उदयनराजेंचा वैयक्तिक करिष्मा , राष्ट्रवादीच्या काही जणांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, उदयनराजेंनी निवडणुकीत लढवलेली व्युह रचना या सगळ्याचा परिणाम म्हणजे मोदींच्या लाटेत ही उदयनराजे राष्ट्रवादीच नव्हे तर राज्यात लक्षणिय मताधिक्‍याने निवडून आले.आता पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यावर पुन्हा एकदा उदयनराजेंना उमेदवारी द्यायची की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे.तीन राजेंचा संघर्ष असे त्याचे स्वरुप आहे.यासंघर्षात राष्ट्रवादी पक्ष स्वतःला का भरडून घेईल,असा ही प्रश्‍न निर्माण होतो.

-Ads-

मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत उमेदवारी ठरवण्याचा मुद्दा महत्वाचा असताना हा मुद्दा केवळ बारा गे सतरा मिनिटात हा विषय संपला आणि पुन्हा केवळ तक्रारी करण्यासाठीच विरोधकांनी स्वतंत्र वेळ मागीतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वेळ दिला मात्र बारामतीत जाऊन विरोध, मुंबईत जाऊन विरोध ,वेळ मागून विरोध या सगळ्यामुळे पक्षांतर्गतच यादवी केवढी मोठी आहे हे मतदारांना समजत आहे. उदयनराजे सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या निवडून आणतो असे विरोधक म्हणत असताना घरातली सीट का राखता आला नाही असा ही प्रश्‍न निर्माण होतो.

विधान सभेच्या निवडणुकांमध्ये बहुतेकांचे मताधिक्‍य घटले असे का झाले ? उदयनराजेंना मिळालेले मताधिक्‍य विरोधातील गटाने त्यावेळी केलेल्या कामाचे फलित असेल तर त्यांच्या घटलेल्या मतांना खासदार जबाबदार आहेत असे समजायचे का ? परिस्थीती प्रश्‍न निर्माण करते आणि त्याला ऊत्तर ही देत असते. त्यातून ही तीन टर्म खासदार एकच व्यक्ती का अशी कुजबुज विरोधात ऐकू येत असताना राष्ट्रवादीच्या अपवाद वगळता बहुतेक सगळे आमदार परंपरागत आमदार आहे. या सगळ्या आमदारांऐवजी नवे उमेदवार विधान सभेला साहेब देणार का ? हे सगळे आमदार नव्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार का ? साहेबांना वैयक्तीक भांडणे सोडवण्यात रस आहे आणि राष्ट्रीय राजकारण करण्यात ? निवडून येणाऱ्या उमेदवाराला ते सांभाळतील की निवडून येण्याची खात्री नसलेल्या उमेदवारला उमेदवारी देतील ? तेंव्हा निवडून येतो त्याचे म्हणणे ग्राह्य धरले जाते आणि पराभूत सांगते ते पोकळ तत्वज्ञान असते एवढीच दखल घ्यावी.

मधुसूदन पतकी

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)