सातारा प्रतिनिधी- आदिशक्तीचा जगर असलेल्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत.सार्वजनिक मंडळांची तयारीही पुर्ण झाली आहे.
सातारचे ग्रामदैवत असलेल्या मंगळाई देवी मंदिराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट केली आहे. पहाटे पाच वाजता घट बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर महापूजा झाल्यावर भाविकांना दर्शन घेता येईल.
मातीचा घट, नाडा पुडी, पत्रावळी, घटासाठीची माती, तसेच कारळ्याची फुले खरेदीसाठी सातारा बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत भाविकांना पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार आहेत. दसऱ्याला जलमंदिर पॅलेस येथून शाही सीमोल्लंघन सोहळा देखील साजरा होतो. या मध्ये श्री. भवानी मातेच्या तलवारीचे पूजन करून मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यात श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होतो. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील फोडजाई, मंगळाई, मरीआई, कालिका माता, रेणुका, तुळजाभवानी,घाटाई, जनाई माळाई., महालक्ष्मी, औन्ध ची यमाई, वाई मांढरदेवची काळूबाई या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा