आदिवासी महानायक बिरसा मुंडा (प्रभात ब्लॉग)

बिरसा मुंडा जयंती निम्मिताने…

१९ शतकात ख्रिस्ती मिशन-यानी झारखंडमध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्था, चर्च यांची स्थापना करून आदिवासींचे वर्ग घेण्यास सुरुवात केली होती. या मिशन-यांच्या शाळामधून, वर्गातून आदिवासी संस्कृती दुय्यम, रानटी आहे. त्यामुळे आमची संस्कृती स्वीकारा, असा संदेश दिला जाई. त्यामुळे साहजिकच आदिवासींमध्ये न्युनगंडाची भावना निर्माण होई. अशाच एका शाळेमध्ये वर्ग सुरु असताना एका चौदा वर्षाच्या किशोरवयीन आदिवासी मुलाने फादरला प्रतिप्रश्न केला. तो मुलगा म्हणजे ‘बिरसा मुंडा’. त्या फादरचे नाव होते फादर ‘ए नोट्रोट’.

-Ads-

बिरसा मुंडा हा मुंडा या आदिवासी जमातीचा मुलगा. बिरसा मुंडाला त्या फादरने आदिवासी समुदायाचे मागास, रानटी, जंगली, हल्लेखोर असे केलेले वर्णन पटले नाही. त्या फादरला कडाडून विरोध करून त्यांनी आपली समृद्ध मुंडारी आदिवासी परंपरा सांगितली. यांचा परिणाम असा झाला की बिरसाला शाळेतून काढून टाकण्यात आले. ए नोट्रोटनी सुद्धा या घटनेनंतर मुंडा समुदाय, त्यांची भाषा यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

१५ नोव्हेंबर, आदिवासी महानायक ‘बिरसा मुंडा’ यांचा जन्म दिवस. देशात अनेक ठिकाणी आदिवासी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. अन्नासाठी कंदमूळ, फळ आणि शिकारीवर प्रामुख्याने अवलंबून असणा-या, अल्प प्रमाणात आणि तेही फिरती स्वरुपाची शेती करणा-या आदिवासी जमातींची दहा कोटी बेचाळीस लाखाहून अधिक लोकसंख्या आज भारतात आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली आदिवासींच्या रुढी परंपरा, चालीरीती, निसर्गधर्म, न्यायनिवाडा करणा-या गणपंचायती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात प्राचीन अस्ट्रोआशियाई भाषाकुळातील भाषा जपणा-या या आदिवासी जमाती आहेत. कोल, संथाळ, हो, उराव, मुंडा या काही आदिवासी जमाती. ज्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या नीती नियमात फरक असले तरी निसर्गपूजनाचा समान धागा या सर्वांमध्ये आहे.

प्राचीन काळापासून या आदिवासी जमातीमध्ये वेगवेगळा कृषक समाज, व्यापारी, सावकार यांचे हस्तक्षेप सुरु झाले. यामुळे जमाती काहीशा अस्वस्थ होत होत्या. मात्र जेव्हा ब्रिटीश राज्यकर्ते आणि ख्रिश्चन मिशनरींचा आदिवासी जीवनात हस्तक्षेप सुरु झाला तेव्हा त्यातून आदिवासी मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. सा-या जगाला सुसंस्कृत करण्याचा विडा उचलण-या ब्रिटिशांचे आदिवासीबद्दलचे विचार ही रानटी, जंगली असेच होते. आदिवासी टोळ्यांची प्रचंड दहशत त्यांच्यात होती. ब्रिटिशांनी येथील पूर्वीच्या शोषक कृषक, व्यापारी, सावकार यांना हाताशी धरून भटक्या स्वरूपातील आदिवासींना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला. फिरत्या स्वरुपाची शेती ही हातानी बिया टाकून केली जायची. ब्रिटीशांनी त्यांना एका जागेत बंदिस्त करून माळरान, खडकाळ जमीन, काही ठिकाणी जंगले काढून शेती करण्यास भाग पाडले. शिवाय या शेतीवर ब्रिटिशांनी कर बसविला. ब्रिटिशांनी दुसरी एक गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी जंगल ताब्यात घेतले. आदिवासींनी जंगलात जायचे नाही, शिकार करायची नाही, कंदमुळे, फळे गोळा करायची नाही. अशी आदिवासींच्या मूळ प्रवृत्तींच्या विरोधात ब्रिटिशांनी धोरण राबविण्यास सुरुवात केले. ब्रिटिशांची ही नीती जंगलाच्या लाकडापासून नफा कमवायचा होता आणि आदिवासींना त्यांच्या क्षमता संपवून एका ठिकाणी स्थानबद्ध करायचे होते. यातून त्यांच्या राज्यकारभारास अडचण होणार नव्हती.

आजच्या झारखंड मधील खुंटी जिल्हयातील उलीहातु गाव. या गावातील सुगना मुंडा आणि करमी हातु यांच्या पोटी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिरसाचे जन्म झाले. गुरुवारी जन्म आणि गुरुवार म्हणजे बृस्पतीवार स्थानिक भाषेत बिस्तवार किंवा बेस्तार असे म्हटले जाते. यावरून बिरसा असे नाव ठेवले गेले. जनावरे चरायला नेणे, मुलांचे गट करून त्यांत खेळणे ही सामान्य मुलासारखी त्याचीही दिनचर्या. त्यातच त्याने उत्तम बासरी वाजविण्याची कला अवगत केली होती. आदिवासी गावामध्ये तरुण मुल जमण्याची, गप्पा गोष्टी करण्याची, खेळण्याची एक जागा असते. त्याला ‘आखाडा’ म्हणतात. या आखाड्यात हा बिरसा मुंडा आपले कृतुत्व दाखवीत असे. बिरसाचे वडील खिस्ती झाले होते म्हणून बिरसा मुंडा यांना दाऊद/डेव्हिड मुंडा असे ही म्हटले जायचे.

बिरसा सर्व गोष्टीकडे चिकित्सकपणे पहायचा. ब्रिटीशांच्या छळाचे आदिवासी समुदायातील असंतोष, ख्रिस्ती मिशन-यांचे आदिवासी समुदायाबद्दलची मते आणि बहुसंख्य लोकांकडून होणारे ख्रिस्तधर्म स्वीकार. या सर्व गोष्टीचा बिरसा विचार करायचा. यामध्ये त्याच्या घरावर बेतलेली गरिबी, बेरोजगारी या सर्वांचा परिपाक म्हणून बिरसा यांनी संघर्षाचा मार्ग अवलंबला. समवयीन तरुणाचे संघटन, आदिवासी परंपरा विशेषतः मुंडारी परंपराचे पुन:जागरण आणि ब्रिटिशांच्या पोलीस चौकीवर हल्ले अशी कारवाई बिरसाच्या नेतृत्वात सुरु झाली. बिरसाच्या या उठावाला आदिवासी समुदायातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ब्रिटीशांनी या गोष्टीचा खुपच धसका घेतला होता. त्यांनी बिरसाला पकडण्यासाठी मोहीम सुरु केली. माहिती देणा-याला किंवा पकडून आणणा-यासाठी बक्षिसे जाहीर केली. ३ मार्च १९०० मध्ये बिरसाला अटक करण्यात आली आणि ९ जून १९०० मध्ये तुरुंगातील वातावरण, छळ यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडा ने आदिवासी जीवनामध्ये एक चैतन्य भरण्याचे काम केले. ब्रिटिशांविरोधी उठावांमध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की, जंगल ही आदिवासींची पोषणकर्ती आई आहे. तीला बंदिस्त करता काम नये. जाचक असे जमीनकर रद्द करावेत. मात्र ब्रिटीशांनी जंगले संरक्षित करून त्यांची अतोनात तोड करणे सुरूच ठेवले. बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी यांच्या आंदोलनाने ब्रिटीशी कारवाई थांबली नसली तरी त्यांना बराच आळा बसला होता. बिरसाने ‘ब्रिटीश आणि मिशन-याची टोपी एकच आहे’ असे सांगून दोघांचे आदिवासी बद्दलचे दृष्टीकोन आणि धोरणे सारखीच असल्याचे जाणीवेच्या पातळीवर जागृती तयार केली. जी ऐतखाऊ आहेत, दुस-यांचे श्रम लुबाडतात त्यांच्यासाठी ‘दिक्कू’ ही संकल्पना वापरून आदिवासींनी त्याच्या कुठल्याच नीतीला बळी पडू नये असे सांगितले.

आजचे अनेक विकास प्रकल्प सुद्धा ब्रिटीश धोरणापासून विशेष फारकत घेणारी नाहीत. आदिवासींनी अंगभर कपडे घालून बर्गर-पिझा खाणे म्हणजे ते ‘मुख्य प्रवाहात’ येणे अशी भाबडी समजूत असते. काहीवेळा जाणीवपूर्वक अशी समजूत निर्माण केली जाते. आदिवासींची संस्कृती, भाषा यांचे आज नवनवे अभ्यास पुढे येत आहेत. आदिवासी जीवनपद्धतीत कमालीचे व्यवस्थापन, निसर्गाचे निरीक्षण आणि त्यातून नियोजन इ. गोष्टीचा अंतर्भाव आहे. ही बाब ध्यानात घेतलो तर अनिश्चित विनाशाकडे नेणा-या विकासनीतीला पर्यायी संतुलित सर्वसमावेशक विकास नीतीचा पर्याय देऊ शकतो.

– बसवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)