अवसरी- निगडाळे व म्हातारबाचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ डॉ. तुषार पवार यांनी केला. तसेच लसीकरण केलेल्या मुला-मुलींना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी डॉ. ज्योती निकम, पर्यवेक्षिका सरोजिनी गावडे, आरोग्यसेवक दत्तात्रय श्रीगादी, शशिकांत थोरात, आरोग्यसेविका सुनंदा कातळे, सुरेखा स्वंयम व डॉ. अशोक तारडे समवेत विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी भागात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेस जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय वाघ, क्रांती पाबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, तालुका पर्यवेक्षक डी. बी. जाधव यांनी भेट दिली. तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 2 हजार 339 लाभार्थी आहेत. यामध्ये 5 उपकेंद्र असून त्यातील तेरुंगण उपकेंद्राच्या अंतर्गत येणारी 5 गावे, 8 वस्त्या, 6 प्राथमिक शाळा, 2 शासकीय आश्रमशाळा व 10 अंगणवाड्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या 1 हजार 48 बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित बालकांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. तुषार पवार यांनी यावेळी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा