आदिवासी दिनी शासकीय सुट्टी द्या

जुन्नरमध्ये मागणीचा ठराव एकमताने मंजूर
जुन्नर  -जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने पुढील वर्षांपासून जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ तालुक्‍यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्याने शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करत जुन्नर येथे नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन या संघटनेचा तालुका शाखेचा उद्‌घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या मागणीसह पहिल्याच बैठकीत महत्वाचे ठराव संघटनेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती राज्य अध्यक्ष मारुती वायळ यांनी दिली.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन या संघटनेच्या जुन्नर तालुका शाखेचा उद्‌घाटन समारंभ हभप महंत योगी बेलनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी शिक्षणाधिकारी यांना संबंधित विषयन्वये आदेश निर्गमित केल्याने संघटनेच्या वतीने विश्वास देवकाते यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच शिवजन्मस्थळ असणारा किल्ले शिवनेरी ताब्यात घेत असताना 1600 आदिवासी मावळे शहीद झाले होते. हा इतिहास जागृत राहावा यासाठी जुन्नर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा चौकातून किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या रस्त्याला वीर बिरसा मुंडा प्रवेशद्वार या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावी, हा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य अध्यक्ष मारुती वायळ व तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लांडे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मारुती वायळ यांनी दिली. संघटनेची नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- ज्ञानेश्वर सखाराम लांडे, उपाध्यक्ष अंकुश भगवंत बांडे, सचिव रवींद्र जाणकू पोटे, सहसचिव सुरेखा नितीन जडर, खजिनदार बुधा कवठे, संचालक- कांताबाई मुकणे, चंदर शिंगाडे, पांडुरंग डावखर, सखाराम मुदगुण, केशव वायाळ, लहू कोरडे, नारायण मडके, भोरु चिमटे, रघुनाथ पारधी, मारुती उंबरे, रामदास सरोगडे, वसंत करवंदे, ज्ञानेश्वर इदे, काशिनाथ जाधव, गोविंद वायाळ, भाऊ उंडे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आदिवासी भागातील नागरिकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणपत लांडे तर केशव वायळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)