आदिवासींच्या कला-कौशल्यांना योग्य मोबदला मिळावा

पुणे – आदिवासी जमातीच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रे पाहून आदिवासींच्या जीवनशैलीतील विविधतेची कल्पना येते. आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करीत आहेत. या चित्रप्रदर्शनामुळे पुणेकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. आदिवासी जमातीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे नृत्य आणि कलाकौशल्य ते जगासमोर यावे आणि त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा, यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

रिजनल ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन (रामा) आणि बालमुद्रा डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने तसेच रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या सहभागाने, छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या 16 राज्यांमधील 125 आदिवासी जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इकोफ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जान्हवी धारिवाल, दिनकर शिलेदार, मीना शिलेदार, अपूर्वा परांजपे, विवेक वेलणकर, महेश घोरपडे, अंजन बर्वे वगैरे रामाचे सभासद उपस्थित होते.

आपल्या देशात विविध संस्कृती आहेत, त्याचे जतन केले पाहिजे, कुशल कलाकार यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. आदिवासी जीवनशैलीवर आधारित हे प्रश्‍न पाहून मी भारावून गेले आहे. ही कल्पना जपणे पुढच्या पिढीचे कर्तव्य असल्याचे जान्हवी धारिवाल म्हणाल्या.

हे प्रदर्शन दि. 15 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 या वेळात राजा रविवर्मा आर्ट गॅलरी, जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. “रामा’चे अध्यक्ष दिनकर शिलेदार यांनी या कार्यक्रमाविषयी तपशीलवार माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)