निगडी – प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. तसेच प्रत्येक आत्मा स्वयंम, सर्वज्ञ आणि आनंदमय असतो. मानवी स्वभावात, वर्तनात दिसणारी दु:ख आणि आनंद ही क्रिया अंर्तआत्म्यातून येत असते. या आत्म्याशी सुसंवाद साधण्याचा मार्ग संत, महात्मे दाखवितात, असे मार्गदर्शन प.पू. प्रतिभाकुंवरजी म.सा. यांनी चातुर्मास प्रवचनाच्या माध्यमातून केले.
साध्वी म्हणाल्या की, आत्म्याशी सुसंवाद साधण्यासाठी प्रथम स्व:ताच्या वर्तनात, आचरणात बदल घडवावे लागतात. बदल घडविण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा साधनेतून, तपातून मिळते. यासाठी मनाचे शुध्दीकरण आवश्यक असते. मन शुध्दीसाठी शुध्द आहार, शुध्द विचार, शुध्द आचरण असावे तरच आत्म्याची शुध्दी होईल. शुध्द, निर्विकार, निरंकार व्यक्ती लवकर आत्म्याशी जवळीक साधू शकतो. प्रथम स्व:ताला ओळखा. सर्वच व्यक्ती स्वतःमधील असणाऱ्या गुण दोषांमुळेच दु:खी, कष्टी असतात. आपल्या स्वभावात बदल करुन, मनावर नियंत्रण मिळवून चुका सुधारुन प्रसन्न चित्ताने पुढे जायला हवे. तोच पुढे जाण्याचा व मुक्तीचा मार्ग संत दाखवितात, असे प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा म्हणाल्या.
निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा