आत्महत्या 655, मदत मात्र 349 शेतकऱ्यांनाच

उर्वरित 302 परिवार शासनाच्या मदतीपासून वंचित

नगर – जिल्ह्यात 2001 ते ऑगस्ट 2018 पर्यंतच्या अठरा वर्षांच्या कालावधीत एकूण 655 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी आत्महत्या केलेल्या 50 टक्‍के म्हणजेच 349 शेतकऱ्यांच्या परिवारास शासनाची आर्थिक मदत प्राप्त झाली आहे. निकषात बसणाऱ्या पीडित शेतकऱ्यांच्या परिवारांना आर्थिक मदतीचा आधार मिळाला असला तरी उर्वरित निकषात न बसलेल्या व त्रुटी आढळून आलेल्या 302 शेतकऱ्यांचे परिवार शासनाच्या मदतीपासून वंचित राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात आणि वर्तमान भाजप-सेना युती सरकारच्या कार्यकाळात कर्जमाफी योजना आणली गेली. मात्र, शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होत नसल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने जनजागृती बरोबरच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्‌या स्वावंलबी बनविण्याचे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. कर्जमाफी बरोबरच शेतमालाला हमीभाव देणे गरजेचे आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आता प्रशासनाकडून विविध विभागातून मराठा समाजातील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शासनाने मराठा समाजासाठी काय काय उपाययोजना राबविल्या याची माहिती मागविण्याचे काम सुरू आहे.
सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन मोहीम राबविली होती. अनेक योजना राबवूनही नैराश्‍याने ग्रासलेले शेतकरी आत्महत्येपासून बाजूला जाताना दिसत नाही, असे शासनाच्या एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्य सरकारकडून 349 शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत करण्यात आली आहे. उर्वरित निकषात न बसलेल्या व त्रुटी आढळून आलेल्या 302 शेतकऱ्यांच्या परिवारांना शासनाची मदत मिळाली नाही.

-Ads-

आत्महत्येत वाढ
जिल्ह्यात 2003 ला एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पुढे हे प्रमाण वाढत गेले. 2006 मध्ये 41, 2007 मध्ये 28, 2013 मध्ये 27, 2014 मध्ये 49, 2015 मध्ये 118, 2016 मध्ये 144 आणि सध्या सुरु असलेल्या 2018 च्या ऑगस्ट महिन्यांपर्यंत 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली. हेच चित्र राज्यभरात आहे. यासाठी सरकारने कर्जमाफी योजना आणली. मात्र, कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होत नसल्याचे एकंदरीत आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)