‘आत्महत्या करणार नाही, तर लढणार’

पुणे – शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये “आत्महत्या करणार नाही, तर लढणार’ हे अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना राबविणार आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरू होणार आहे. तर उस्मानाबाद येथे सांगता होणार आहे. दि. 1 ते 9 मेदरम्यान हे अभियान होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिकांना मिळणारा भाव, उत्पादन खर्च, जीएसटी, नोटबंदीचा परिणाम, पेट्रोल आणि खत औषधींचे वाढलेले दर यांचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. उत्पादन खर्च वाढला असून तुलनेने पिकांना मिळणारी किंमत नगण्य आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यातून तो निराश होवून आत्महत्याचा पर्याय स्वीकारत आहे. त्याला रोखण्यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 1 मे रोजी शिंदखेडा जि. धुळे येथील विखरण येथून हे अभियान सुरू होणार असून धर्मा पाटलांचा मुलगाही या अभियानात सहभागी होणार आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला दीडपट हमी भाव मिळावा, यासाठी संघटनेने दोन विधेयक तयार केले आहे. ते संसदेने मंजूर करावे, यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदन देण्यात येणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. दरम्यान, सांगली, कोल्हापूर भागतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे आठ दिवसांत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

‘सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’
भाजपचे उपोषण म्हणजे “सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’ असा प्रकार आहे. विरोधकांनी अधिवेशन चालू दिले नये, असा आरोप करत भाजप नेते उपोषणाला बसले. मात्र, अधिवेशनाचे कामकाज पहिल्यांदा कोणी रोखले? त्यानंतर पुन्हा अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी कोणी कोणाला भाग पाडले? याचा मी साक्षीदार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न समोर येवू द्यायचे नाहीत, म्हणून अधिवेशन चालू दिले नाही. एकीकडे पंतप्रधानांच्या नावाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे नेते उपोषण करत आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर
स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रकाश पोफळे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ते पदी योगेश पांडे आणि अनिल पवार यांनी नेमणूक करण्यात आली. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)