आत्महत्या करणारे जोडपे प्रेमी युगुल

महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या सहाय्याने मृतदेह दरीतून बाहेर
महाबळेश्वर, दि 27 (प्रतिनिधी) –
महाबळेश्‍वर येथील लिंगमळा धबधब्यावरुन हाताच्या नसा कापून घेत 350 फूट खोल दरीत उडी घेऊन एका जोडप्याने आत्महत्या केली.आत्महत्या करणारे जोडपे दांपत्य नसून तर प्रेमी युगुल असल्याचे समोर आले आहे.शनिवारी पहाटे पोलिसांनी महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या सहाय्याने दोघांचीही मृतदेह बाहेर काढले असून दोन्ही मृतदेहाची ओळख पटली आहे. या घटनेतील महिलेचे नाव प्रियांका शिंदे (वय 26) असे असून ती विवाहित आहे तर पुरुषाचे नाव अविनाश शिर्के असे आहे.
शुक्रवारी सायंकाळी महाबळेश्‍वर येथील लिंगमळा धबधब्यावरुन 350 फूट खोल दरीत उडी मारुन जोडप्याने आत्महत्या केल्याची माहिती महाबळेश्‍वर पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महाबळेश्‍वर ट्रेकर्स जवानांच्या सहाय्याने जोडप्याला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केली. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर शनिवारी मध्यरात्री दीड वाजता दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना यश आले. यावेळी मृतदेहाशेजारी पडलेल्या साहित्यामध्ये मुलाचे व महिले आधारकार्ड आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, अविनाश हा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविणाऱ्या अशोक शिर्के यांचा मुलगा असून अहमदनगर जिल्ह्यातील निंबवी येथील राहणारा आहे. तर प्रियांका ही विवाहित असून तिचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यात असणाऱ्या नऱ्हे गावातील मनोहर शिंदे यांच्याशी विवाह झाला आहे. प्रियांकाला दोन मुले आहे. अविनाश आणि प्रियांका या दोघांचे वडिल सैन्यदलात होते. त्यांची नेमणुक बेळगाव येथे असताना प्रियांका आणि अविनाशची शाळेत मैत्री झाली होती. आठवी ते दहावीपर्यंत दोघेही एकत्र शिकत होते. याचवेळी दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले होते. दहावीनंतर तीन-चार वर्षांतच प्रियांकाला अठरा वर्ष पूर्ण होताच तिचा मनोहर शिंदे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर ती नऱ्हे येथे आपल्या पतीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांका आणि अविनाश हे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि प्रेमाचे बंध पुन्हा घट्ट झाले. गुरुवारी प्रियांका आणि अविनाश दोघेही महाबळेश्‍वर येथे आले. गुरुवारी रात्री दोघेही येथीलच एका हॉटेलमध्ये राहिले. शुक्रवारी ते लिंगमळा धबधबा परिसरात गेले आणि तिथून दोघांनीही हाताच्या नसा कापून सुमारे 350 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, प्रियांका बुधवारी घरातून बाहेर जाते असे पतीला सांगून गेली ती रात्री उशिरापर्यंत परतलीच नाही. त्यामुळे पतीने शोधाशोध करत ती कुठेही आढळून न आल्याने सिंहगड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविली होती.
दोघांचेही मृतदेह दरीत बाहेर काढल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकरांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी गायकवाड, आशोक काशीद व श्रिकांत कांबळे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)