आता 3 वर्षांत तीनवेळा होणार “सेट’ची परीक्षा

युजीसीची निर्णय : 32 विषयांसाठी वर्षातून एकदाचे नियोजन

– व्यंकटेश भोळा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाला येत्या 3 वर्षांत तीनवेळा “सेट’ची परीक्षा घेण्याची परवानगी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) 2 दिवसांपूर्वी दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांत 3 वर्षांत तीनवेळा “सेट’ची परीक्षा घेण्यावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यांत घेण्यात येते. यावर्षी दि. 28 जानेवारी 2018 रोजी “सेट’ची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा “सेट’ची परीक्षा कधी होणार आहे, याविषयी अनिश्‍चितता होती. सेट विभागाला परीक्षा घेण्यासाठी युजीसीची मान्यता मिळणे आवश्‍यक असते. त्या पार्श्‍वभूमीवर आता युजीसीने मान्यता दिल्याने “सेट’ परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस म्हणाले, युजीसीकडे सेट परीक्षेस अनुमती मिळावी, असा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार युजीसीची अॅक्रिडेटेशन समिती दि. 24 ऑगस्ट रोजी विद्यापीठाला भेट दिली. त्यानंतर समितीने आपला अहवाल युजीसीकडे सादर केला. युजीसीचे तीन वर्षांत तीन “सेट’ची परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याचे पत्र दि. 23 ऑक्‍टोबर रोजी प्राप्त झाले. त्याप्रमाणे आता 32 विषयांसाठी पुढच्या 3 वर्षांत वर्षातून एकदा सेट परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

आता तीनऐवजी दोनच पेपर
युजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पुढची “सेट’ची परीक्षा होईल. त्यात तीनऐवजी दोनच पेपर होतील. तेही वस्तुनिष्ठ प्रश्‍न असतील. पहिला पेपर जनरल अॅटिट्यूड टेस्ट तर, दुसरा पेपर संबंधित स्पेशल विषयावर असेल. यापूर्वी “सेट’ परीक्षेला 5 तासांचा कालावधी होता. आता दोन्ही पेपर 3 तासांत पूर्ण होतील. पहिला पेपर एक तासाचा असून, त्यात 50 प्रश्‍न आणि 100 गुणांचे असेल. दुसरा पेपर 100 प्रश्‍नांचा असून ते 200 गुणांचा असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील.

सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या “सेट’ परीक्षा युजीसीच्या नवीन नियमावलीनुसार फक्‍त पात्रतेसाठी होतील. त्यामुळे परीक्षा सेटिंगपासून सर्व प्रक्रियेची सुरुवात मुळापासून करावी लागणार आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढची परीक्षा मार्च-एप्रिल 2019 मध्ये नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने सेट परीक्षा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.
– डॉ. बी. पी. कापडणीस, सेट विभागाचे समन्वयक

“नेट’ची पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा
यंदापासून “सीबीएसई’द्वारे नव्हे, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेटची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पहिल्यांदाचा ऑनलाइनद्वारे घेण्यात येत असून, त्याची परीक्षा 9 ते 23 डिसेंबर 2018 या कालावधीत होत आहे. या परीक्षेसाठी अॅडमिड कार्ड 19 नोव्हेंबरपासून डाऊनलोड करून घेता येणार आहे. या परीक्षेचा निकाल 10 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)