‘…आता “सुराज्या’साठी गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ’ -मुख्यमंत्री

  2022 मधील भारताबाबत देखावे सादर करण्याचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा

पुणे – लोकमान्य टिळकांनी “स्वराज्या’साठी गणेशोत्सव सुरू केला, आता “सुराज्या’साठी गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील. या पाच वर्षांत भारताला नवभारत बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुजवली आहे. त्यामुळे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेशमंडळांनी 2022 वर्षाचा नवभारत कसा असेल, या विषयीचे देखावे साकारावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारवाड्यावर शनिवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राज्याच्या खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, खासदार संजय काकडे, माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, अनिल भोसले आदी आमदार यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव हा सामाजिक उत्सव आहे. या उत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त नवभारताचे स्वप्न पाहिले आहे. त्याचप्रकारे पुणेकरांनीही आपल्या स्वप्नातील नवभारताचा संकल्प हाती घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ब्रिटीशांच्या राजवटीत जनसामान्यांची विजिगीषू वृत्ती संपली होती. परंतु लोकमान्य टिळकांनी ही विजिगीषू वृत्ती जागृत करण्यासाठी श्रीगणेशालाच आवाहन केले आणि त्याच्या उत्सवातून जनसामान्यांना एकत्रित केले. त्यामुळे हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक उत्सव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात भाऊ साहेब रंगारी आणि टिळकांच्या बोधचिन्हाबाबत असलेल्या वादाबाबत उल्लेख करणे टाळले.

पोलीस आयुक्तांना आवाहन
ही गणेश मंडळे आपलीच आहेत, त्यामुळे कायदा पाळताना सर्व गणेशमंडळांसोबत प्रेमाने वागा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना केली. मात्र याचा अर्थ “कसेही वागा’, असा मंडळांनी घेऊ नये, त्यांनीही कायद्याचे पालन करावे, अशा कानपिचक्‍याही मुख्यमंत्र्यांनी मंडळांना दिल्या. त्यावर प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्याही वाजल्या.

बोधचिन्हाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्यात यावा, असे सांगत महापौरांनी बोधचिन्हाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यात लोकमान्य टिळकांचे असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. टिळकांनी बिनीवाले, खासगीवाले, पाटणकर, भाऊ रंगारी या सहकाऱ्यांसमवेत 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून त्याची 11 व्या दिवशी त्याची मिरवणूक काढली होती, असे सांगत त्यांनी भाषणात भाऊ रंगारींचाही उल्लेख केला. तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे पदाधिकारी आपल्याला भेटायला आले होते, असे सांगून महापौर म्हणाल्या, त्यांनाही आपण आवाहन केले आहे की, सामाजिक बांधिलकी आपण एकत्र जपायची आहे. गणेशोत्सवाकडे सामाजिक भावनेने पहावे.

महिनाभर वैविध्यपूर्ण उपक्रम
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने महिनाभर वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेले बोधचिन्ह, शुभंकर, पिवळा ध्वज आणि “थीम सॉंग’ चे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 125 वर्षे पूर्ण केलेल्या तसेच शहरातील सर्व मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले; तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.

“थीम सॉंग’ मध्येही स्मार्ट सिटीचाच उदो उदो
गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने बनवलेल्या “थीम सॉंग’मध्येही त्यांनी “स्मार्ट सिटी’चाच उदो उदो केला आहे. गणेशोत्सवाचा इतिहास सांगताना भाजपचे ब्रॅन्डिंग असलेल्या “स्मार्ट सिटी’चा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)