आता सरकारी बैठकांमध्ये पौष्टिक पदार्थ – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे परिपत्रक जारी

प्लॅस्टिकच्या बाटल्याही हद्दपार होण्याची शक्‍यता

एम्समध्येही लागू होणार आदेश

नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांदरम्यान चहासोबत बिस्कीट देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी घेतला आहे. सरकारी बैठकांमध्ये बिस्कीट देण्याऐवजी बदाम, चणे, खजूर, अक्रोड इत्यादी पौष्टिक पदार्थ देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

यासंबंधीचे एक परिपत्रक आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी जारी केले आहे. यामध्ये सरकारी बैठकांमध्ये कुकीज, बिस्कीट आणि इतर फास्ट फूड न देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याऐवजी पौष्टिक पदार्थ देण्यात यावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

तसेच फास्ट फूड ऐवजी इतर कोणते पदार्थ दिले जाऊ शकतात, याची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यास सांगितली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एम्समध्येही हे आदेश लागू होणार आहेत.

केवळ आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांदरम्यानच नव्हे तर सरकारी कॅंटीनमधूनही बिस्कीट हटवण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. शरीरास हानिकारक पदार्थ टाळले जावेत, असा आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचा यामागचा उद्देश आहे.

या परिपत्रकात प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी आरोग्यास हानिकारक असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारी बैठकांमधून प्लॅस्टिकच्या बाटल्याही हद्दपार होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here