आता शासकीय कार्यालये बंद पाडूः घुले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या
शेवगाव – भाजप सरकारच्या काळात केवळ वांझ घोषणांना उत आला आहे. प्रत्यक्षात एकाही घोषणेची पूर्तता झाली नाही. सर्वसामान्य जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांची केवळ दिशाभूल चालु आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप धोक्‍यात आले.कर्जमाफीचे घोटाळे, बोंडअळी अनुदानाच्या भेदभावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा तालुक्‍यातील युवक, शेतकरी, रस्त्यावर उतरून शासकीय कार्यालये बंद पाडू, असा इशारा पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी सोमवारी दिला.
शेवगाव-पाथर्डी तालुक्‍यातील चालु खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीवरील बोंडअळीग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावेत तसेच मुळा धरणाचे पाटपाणी टेल तो हेड देऊन संपूर्ण लाभ क्षेत्रतील शेतकऱ्यांचे भरणे झाल्याशिवाय ते बंद करू नये, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन दिले. यावेळी सभापती घुले बोलत होते.
घुले म्हणाले, लोकप्रतिनिधींचे मतदार संघात लक्ष नाही. टंचाई आढावा बैठकही घेतली जात नाही. विजेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. विकास कामे ठप्प आहेत. कपाशी हे परिसरातील मुख्य पिक आहे. सुरुवातीला अल्पशा पावसावर मोठ्या अपेक्षेने मोला महागाचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी 75 हजार एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावाने संपूर्ण पिक हातचे गेले. खरिपाच्या तुर, बाजरी, मुग, उडीद, ही पिकेही पूर्णतः करपली. कृषी विभागाने बोंडअळी बाधित कपाशी बरोबरच सर्व खरिपाच्या पेऱ्याचे सरसकट पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा. अन्यथा उद्रेक होवून सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.
बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी मागील बोंडअळी अनुदान सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ज्यांना मिळाले. त्यांना मिळाले ते नुकसानीपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्‍त होत आहे. रामनाथ राजपुरे यांनी दुष्काळामुळे पुर्व भागातील अनेक गावांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा दुर्लभ झाल्याने जनावराच्या छावण्या सुरु करण्याची मागणी केली. माजी उपसभापती अंबादास कळमकर यांचेही भाषण झाले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, ताहेर पटेल, एकनाथ कसाळ, नाना मोटकर, विष्णुपंत बोडखे, हनुमान पातकळ, पाराजी नजन, बाबासाहेब जमधडे, एकनाथ काटे, दिपक वाघमारे, संतोष जाधव, बंडु खताळ, अजय नजन, रोहन साबळे, ऋषिकेश काळे, अशोक धस, रामेश्वर कातकडे, शुभम चाफेकर, अमर जाधव, अशोक दुकळे, ज्ञानदेव खरड, सोपान चेडे, संतोश धस, प्रल्हाद सुडके, रावसाहेब घाडगे, विठ्ठल आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी किती हुतात्मे होवू देणारः घुले
दि.9 ऑगस्ट क्रांतीदिनी अनेक हुतात्मे झाल्याचे स्मरण देवुन आता आणखी हुतात्मे होवु देणार? असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केला. 30 हजार हेक्‍टर क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. खरीपाची अन्य पिकेही करपल्याने सर्व पिकाचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे. शेवगाव- पाथर्डी प्रादेशिक नळ योजनेमध्ये आणखी काही गावांचा नव्याने समावेश करून 275 कोटीची मंजुरी घेवुन प्रशासकीय मंजुरीही मिळवली होती. मात्र पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. चालु वर्षी मुळा धरणात पुरेसे पाणी आहे.त्याचे आवर्तन टेल टू हेड अशा रीतीने द्यावे व पूर्ण क्षेत्राचे भरणे झाल्याशिवाय आवर्तन बंद करू नये, अशी मागणी त्यांनी केली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)