आता राष्ट्रीय स्तरावर महागठबंधन करू – शरद यादव

लालूंनी बोलावलेल्या सभेत शरद यादवांची गर्जना

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज येथील गांधी मैदानावर आयोजित केलेल्या सभेला देशातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. नितीशकुमारांनी बिहारमधील महागठबंधन तोडून भाजपची साथ संगत केली. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही सर्व विरोधकांना एकत्र आणून राष्ट्रीय स्तरावर महागठबंधन करून दाखवू अशी गर्जना नितीशकुमारांशी फारकत घेतलेले संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केली आहे.

आज झालेल्या या सभेला लालूप्रसाद, शरद यादव यांच्या खेरीज समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, कॉंग्रेसचे गुलामनबी आझाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारीक अन्वर, राष्ट्रीय लोकदलाचे चौधरी जयंतसिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, बाबुलाल मरांडी, कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर रेड्डी इत्यादी नेते उपस्थित होते. द्रमुक, जनता दल सेक्‍युलर, आरएसपी या पक्षांचे प्रतिनिधीही या सभेला उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद यादव म्हणाले की, बिहार मध्ये, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांच्यात जे महागठबंधन झाले होते त्याला लोकांनी पसंती दिली होती. भरघोस बहुमत दिले होते पण येथे जनतेचाच विश्‍वासघात झाला. पण आता आम्ही याही पेक्षा मोठा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर करून दाखवू. देशात धर्म आणि राजकारण यांचे मिश्रण केले जात असून हा प्रयोग देशाला विघातक ठरणार आहे.

धर्म आणि राजकारण एकत्र आले की काय घडते याचे चित्र आपण अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानात पाहिले आहे. भारताची तशी स्थिती होऊ नये यासाठी आपण प्राणपणाने लढा देऊ असा निर्धारही शरद यादव यांनी व्यक्त केला. दोन महिने वाट पहा आमचा पक्षच खरा संयुक्त जनता दल पक्ष आहे हे आम्ही दाखवून देऊ असा निर्धारही शरद यादव यांनी यावेळी केला. या सभेला मोठी गर्दी होती. नितीशकुमारांशी फारकत झाल्यानंतर प्रथमच लालूप्रसाद यादव यांनी हे शक्तीप्रदर्शन घडवले. त्यात प्रथमच लालू आणि शरद यादव हे एकाच व्यासपीठावर आलेले दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)