आता रविवारीही अतिक्रमण कारवाई

– वर्दळीच्या रस्त्यांसाठी दोन स्वतंत्र पथके
– वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
 
पुणे – शहरात वर्दळींच्या रस्त्यांवर रविवारी मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिकांकडून अतिक्रमणे केली जातात. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन या पुढे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रविवाराही कारवाई केली जाणार आहे.

कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय आणि शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर ही कारवाई केली जाणार असून त्यासाठी दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत दोन स्वतंत्र पथकांची नेमणूक केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात रविवारच्या दिवशी शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता तसेच पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. जंगली महाराज रस्ता तसेच फर्गसन रस्त्यावरही या दिवशी मोठी वर्दळ असते. या सर्व रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्याने रविवारच्या दिवशी या सर्वच रस्त्यांवर पथारी व्यावसायिक येतात तसेच अनधिकृतपणे रस्त्यावरच पार्किंगही केले जाते.

त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा फटका शहरातील इतर रस्त्यांनाही बसतो. या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यातच अतिक्रमण विभागाकडून केवळ कार्यालयीन दिवशीच अतिक्रमण कारवाई केली जात असल्याने या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण विभागाने आता रविवारही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जगताप यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

दोन स्वतंत्र पथके

रविवारी करण्यात येणाऱ्या या कारवाईसाठी कसबा-विश्रामबागवाडा आणि शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालये निवडण्यात आली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र फिरती पथके नेमण्यात येणार असून ती प्रामुख्याने सायंकळाच्या वेळेत ही कारवाई करणार आहेत. या पथकांसोबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. तसेच यात प्रामुख्याने अनधिकृत तसेच जागा नेमून दिल्यानंतर इतर ठिकाणी व्यवसाय करणारे, तसेच पथारी परवाना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)