आता महिन्यातून दोन दिवस “सायकल डे’

प्रभात पॉझिटीव्ह
सायकल योजनेच्या प्रचार, प्रसिद्धीवर दिला जाणार भर
सुनील राऊत

पुणे  – खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुन्हा एकदा सायकल वापराव्यात, यासाठी “पब्लिक बायसिकल शेअरिंग’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महापालिका प्रशासन प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन दिवस “सायकल डे’ योजना राबविली जाणार आहे.

सायकल विभागाचे प्रमुख नरेंद्र साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती साळुंखे यांनी “प्रभात’ला दिली. सायकलींचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख होती. मात्र गेल्या तीन दशकांत ती नामशेष झाली असून सायकलींची जागा खासगी वाहनांनी घेतली आहे. ही संख्या एवढी लक्षणीय आहे, की शहरात दरडोई 1 दुचाकी आहे. त्यामुळे शहरात पर्यावरण, प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही बाब लक्षात घेऊन पुणेकरांनी किमान जवळच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी सायकल वापरावी, यासाठी महापालिकेने पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुढील काही वर्षांत 1 लाख सायकल्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने 4 कंपन्यांशी करार केला असून सुमारे 8 हजार सायकल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून जवळपास 6 लाख पुणेकरांनी सायकलींसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, त्यातील केवळ 25 ते 30 टक्केच नोंदणीधारक नियमित सायकल वापरत आहेत. त्यामुळे योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशी करणार जनजागृती
सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून महिन्यातून 2 दिवस अथवा कोणतातही एक दिवस “सायकल डे’ म्हणून घोषित केले जाणार आहे. या दिवशी शासकीय कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सायकल वापराव्यात, असे आवाहन केले जाणार आहे. या पूर्वीही महापालिकेत अशा प्रकारे काही प्रमुख अधिकारी आठवडयातून एक दिवस सायकल वापरत असत. मात्र, त्यावेळी ही योजना नव्हती. पण, आता हे दिवस कायमस्वरूपी निश्‍चित केले जाणार आहेत.

तयार होताहेत सायकल ग्रूप
महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकलींमुळे शहराच्या अनेक भागांत सायकल ग्रूप तयार होत आहेत. या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महापालिकेकडून या सर्व ग्रूपला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी सायकल विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत विभाग प्रमुखांसह इतर कर्मचारी दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांत सायकलवर जाऊन सायकल वापरणाऱ्यांशी चर्चा करत असून त्यांच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)